ठाणे : प्रताप सरनाईक यांना ईडीची भीती वाटत असेल, तर ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, तसे त्यांनाही अधिकार आहेत. त्यासाठी क्वारंटाइन होण्याची गरज नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे आवाहन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केले.
भातखळकर म्हणाले की, महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे, हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ॲड, माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही. वाडा, पालघर येथील भातखरेदी केंद्र बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेबरोबर जाणार का? असा सवाल त्यांना केला असता, भाजप सर्वच निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वच स्तरांवर सरकार ठरले अपयशीबोईसर : शिवसेनेच्या बदलत्या भगव्या रंगाबरोबर जनतेला लुटण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या वेळी ठाकरे सरकारच्या १० घोटाळ्यांचा पाढा त्यांनी वाचून तर दाखवला. तसेच कोरोनाच्या नावाने केलेल्या घोटाळ्याचा उल्लेख करून मुंबईच्या महापौरांसह, मंत्री अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचाही समाचार घेतला. कोरोनास्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.