कल्याण : केडीएमसीच्या ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक आहे, त्यांनी तो घातलाच पाहिजे, जर कोणी गणवेश घातला नाही तर त्याचा खाडा लावा, असे आदेश महापौर विनीता राणे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिका-यांना सोमवारी दिले. महापालिकेतील सफाई कर्मचारी, शिपाई आणि कामगारांप्रमाणे कंत्राटी सफाई कामगारांनाही गणवेश बंधनकारक आहे. कंत्राटदाराकडून अटी-शर्थीचा भंग होत असेल तर त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करावी, असेही महापौरांनी अधिकाºयांना बजावले.महापौर शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार कक्ष, ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागाच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिली. तेथील साचलेला कचरा आणि घाणीचे साम्राज्य पाहून संतप्त झालेल्या महापौरांनी प्रभाग अधिकाºयांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. आपत्कालीन कक्षात उपस्थित असलेले कामगार गणवेशात नव्हते, हे निदर्शनास येताच याप्रकरणी महापौरांनी संबंधित कामगारांना जाब विचारला. गणवेश हा घातलाच गेला पाहिजे, दोन वर्षांतून गणवेशाचे दोन जोड मिळतात तसेच दरमहा २०० रुपये धुलाई भत्ता मिळतो मग गणवेश का घातला जात नाही, असे खडेबोल महापौरांनी सुनावले. चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी गणवेश घातलाच पाहिजे, असा आदेश महापौरांनी झाडाझडतीनंतर जारी केला.दरम्यान, सोमवारी महापौरांनी मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाºयांची बैठक घेत ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली. जर कोणी गणवेश नाही घातला तर त्याचा त्या दिवसाचा खाडा लावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला साहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.>महापालिकेचे ‘ते’ कर्मचारी कुठे वळवले?केडीएमसीच्या दहा प्रभागांपैकी ब, क, ड आणि जे या चार प्रभागांमधील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. याठिकाणी कंत्राटदाराच्या कामगारांकडूनच कचरा उचलला जातो. मग या प्रभागांमधील महापालिकेचे सफाई कामगार अन्यत्र कुठे वळविले, याचीही माहिती घनकचरा व्यवस्थापनाने द्यावी, असेही महापौरांनी सांगितले.लवकरच स्वच्छता मार्शल : प्रभागांमध्ये स्वच्छता मार्शल नियुक्त करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. स्वच्छता मार्शल यांच्याकडून दंडात्मक कारवाई होणार असल्याने याची माहिती नागरिकांनाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी एक मोठा कार्यक्रम घेऊन याबाबत जागृती करण्याचा निर्णयही महापौरांनी यावेळी घेतला.
गणवेश न घातल्यास, खाडा लावा, महापौरांनी अधिकाऱ्यांना बजावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:40 AM