ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. परंतु, या सूचना फक्त कोरोनाकाळापुरत्याच असाव्यात. पुढील वर्षी परिस्थिती सुधारल्यास या सूचनांना स्थगिती देऊन दरवर्षीच्या सूचना अमलात आणाव्यात, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार, मंडळांनीही हा उत्सव यंदा कसा साजरा करता येईल, या दृष्टीने बैठका घेऊन नियमावली तयार केली आहे. येत्या दोन आठवड्यांनी गणेशोत्सव साजरा होत आहे, त्या अनुषंगाने पालिकेने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा, यासंबंधी गुरुवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेचे हे नियम या वर्षापुरतेच असावे, असे समितीचे म्हणणे आहे.महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मात्र, तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तो कमीतकमी दिवस साजरा करावा. गणपतीची मूर्ती चार फुटांच्या मर्यादेत असावी. मंडळांनी मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असून मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स अॉक्सिमीटरद्वारे भाविकांची तपासणी करावी. त्यांची नोंद ठेवावी. मंडपामध्ये एकाचवेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे. या व इतर सूचना महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी जाहीर केल्या आहेत.यंदा सूचनांची अंमलबजावणी करूकोरोनामुळे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अंमलबजावणी करतील, परंतु पुढील वर्षी परिस्थिती पूर्ववत आल्यास या सूचनांना पालिकेने स्थगिती देऊन दरवर्षीचे नियम लागू करावे, असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवाबाबतचे हे नियम कोरोनाकाळापुरते आहेत. पुढच्या वर्षी काय परिस्थिती असेल, हे आता सांगता येणार नाही.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका
"परिस्थिती पूर्ववत झाल्यास दरवर्षीचे नियम लागू करा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:27 AM