ठाण्यातील एका चित्रपट गृहात प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. आज न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. मात्र यानंतर, आव्हाडांच्या वकीलाने त्यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. यावर, न्यायालयाने आव्हाडांसह 12 जणांना दिलासा देत अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. यानंतर आव्हाड यांनी एक ट्विट करत "काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते!" असे ट्विट केले आहे.
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, "काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते! #चाणक्य ची नीती फसली, जामीन, जेवण दोन्ही मिळाले," असे म्हटले आहे. न्यायालयाने, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात त्यांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने त्यांना घालती असून त्यानंतरच जामीन मंजूर झाला आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर न्यायालयात सुनावणीला आज सकाळी सुरुवात झाली. आव्हाड यांच्या वतीने ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला.आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ऍड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम 7 हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी देखील, मी स्वतःहून चौकशीसाठी आलो होतो, असे सांगत आपण तपासाला पूर्ण सहकार्य केले असल्याचे न्यायालयात सांगितले. सरकारी वकील म्हणून अॅड. अनिल नंदीगिरी यांनी कोर्टात पोलिसांची बाजू मांडली.