लाेकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ तालुका भारतीय जनता पक्षामार्फत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक अंबेशीव इथे पार पडली. ग्रामीण भागातील रखडलेल्या समस्यांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी राज्यातील सरकारवर टीका करीत हे सरकार बुडविल्यानंतरच मतदार संघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या अनेक पॅनलचा पराभव झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपला बळकटी यावी, यासाठी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण भागात असलेल्या लहान-मोठ्या गावांमधील रखडलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. मुरबाड विधानसभा मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून, वालिवली येथील उल्हास नदीवरील पुलाची नव्याने बांधणी होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी कशी असावी, यावर आमदार कथोरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांमुळे ग्रामीण भागात भाजप वाढलेलीच आहे. भाजपची विचारसरणी मतदारसंघात रुजविण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या विद्यमान सरकारला बुडवल्यानंतर मार्गी लावणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या बैठकीला अंबरनाथ तालुका भाजपचे अध्यक्ष राजेश पाटील, हेमंत भोईर, शिवाजी कथोरे, कृष्णा शिंदे, भगवान पाटेकर, राजेश पाटेकर यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.