ठाणे :
विद्यापीठातही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करू; परंतु त्याची फाईल मंजुरीकरिता राज्यपालांकडे पाठवावी लागेल. राज्यपालाकंडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते, असा आमचा अनुभव असल्याची कोपरखळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा नामोल्लेख न करता मारली.
प्रस्तावाची फाईल मंजूर करण्यासाठी वेळ पडल्यास मधू मंगेश कर्णिक यांना घेऊन जाऊ; किमान त्यामुळे तरी फाईल लवकर मंजूर होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. अ. भा. साहित्य, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता होणाऱ्या निवडणुका, वाद यांमुळे तीन महिने अगोदरच या अध्यक्षपदाचा मान संपतो, असा टोला सामंत यांनी साहित्यिकांना लगावला.कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्यातर्फे डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित दुसऱ्या युवा साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, कोमसपचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के उपस्थित होते. सामंत म्हणाले की, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडायचे झाल्यास तीन-तीन महिने खलबते चालतात. कोण अध्यक्ष होणार, त्याचा कार्यकाळ काय, किती पुस्तके लिहिली, याची चर्चा होते. परंतु युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात आली. हे चांगल्याचे लक्षण आहे. युवा साहित्य संमेलनाने पाडलेला पायंडा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने आचरणात आणावा, असे सामंत म्हणाले. साहित्यामध्ये किंवा साहित्यिकांमध्ये निवडणूक कसली करायची? निवडणूक आम्ही राजकीय नेते लढवतो ते बस्स आहे. साहित्य, नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेताना वाद होत असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान हा तीन महिने आधीच संपतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढील युवा साहित्य संमेलन रत्नागिरीला करुया, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जिल्ह्याच्या स्तरावर तेथील प्रत्येक कलाकारांची, साहित्यिकांची स्मारके तयार झाली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. यापुढील परीक्षा ऑफलाइनमहाराष्ट्रातील विद्यार्थी कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत. ज्यावेळेस संकट होते, त्यावेळी ऑनलाइन परीक्षा घेतल्या, वेळप्रसंगी रद्दही केल्या; परंतु प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा संवाद झाला पाहिजे. शिक्षण जर ऑनलाइन झाले तर त्याचे तीनतेरा वाजू शकतात. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेणे हेच योग्य असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.राजकारण्यांचे कवी संमेलन घ्यासाहित्य संमेलनात एकदा राजकारण्यांचे कवी संमेलन घ्या, अशी विनंती सामंत यांनी केली. त्याचे अध्यक्ष कोण असतील, हे तुम्हाला माहिती आहे, असे सामंत बोलताच सभागृहात हशा पिकला. मी कोणाचेही नाव घेतले नाही, कुणाचे नाव घेऊन कुठे माझी चौकट छापून येईल, असे मी काही करत नसल्याची कोपरखळी त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांना लगावली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्त्रियांच्या बाबतीत भारताइतकी वाईट स्थिती कोणत्याही देशात नसल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर स्त्री सक्षम होणे दूर राहिले. तिच्या संरक्षणाचा मुद्दादेखील सुटू शकला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली.