ठाणे : ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. नक्कीच या सच्चाईला ठाणेकर, नवी मुंबईकर असेल किंवा मीरा-भाईंदरकर या ठिकाणी मला साथ देतीलच. परंतु विरोधकांना अद्यापही उमेदवार मिळत नसेल तर मला वाटतंय त्यांनी मला बिनविरोध निवडणूक द्यावे, असा चिमटा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचे काम केले.
गुरूवारी २८ मार्च रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विचारे यांनी प्रचाराला सुरू केली. यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. याचदरम्यान, एकीकडे ठाकरे गटाने ठाणे लोकसभेचा उमेदवाराची घोषणा केली तरी सुद्धा दुसरीकडे शिंदे गटाला अद्यापही उमेदवार मिळत नाही. त्यामुळे विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना डीवचण्याची संधी सोडली नाही.
आज हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आजच्या पवित्र दिवशी या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नतमस्तक झाले. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाची निर्मिती केली, त्यावेळेस सर्व जाती-धर्माच्या लोकांना बारा बलुतेदार १८ पगड जाती त्याच बरोबर सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याच पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये चांगले स्वराज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जावा लागेल असे आवाहनही त्यांनी केले., या देशांमध्ये ज्या पद्धतीने सर्व पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी जवळ करण्याचे काम केले जात आहे. या सर्व गोष्टींचा सबंध लक्षात घेता, ही जनता सुद्धा त्यांना कंटाळलेली आहे, अशी टीका नाव न घेता,भाजप सरकारवर विचारे यांनी केली.