लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रिक्षाच्या भाड्यात वाढ झाल्यानंतर आता प्रवासीही आक्रमक झाले आहेत. रिक्षात दोन प्रवासी बसवल्यावरही प्रत्येक प्रवाशांकडून २० रुपये वसूल केले जात असल्याबाबतच्या तक्रारी प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाला (पाम) या संघटनेकडे येत आहेत. त्यावर प्रवाशांनी शेअर पद्धतीने दोन सीट भरल्या असल्यास प्रत्येकी १२ रुपये द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोग्रासवाडी ते स्टेशन किंवा मानपाडा रोड ते स्टेशन शेअर रिक्षाचे किती भाडे द्यावे याबद्दल विचारणा झाली असता संघटनेने समाजमाध्यमावर ही जाहीर प्रतिक्रिया संघटनेच्या वतीने देण्यात आली तसेच रिक्षाचालक दोन आसनी घेऊन २० रुपये मागत असेल तर मात्र त्याला नकार देऊन १२ रुपयेच द्यावेत. त्या चालकाने ऐकले नाही, हुज्जत घातली तर वाहतूक पोलीस, आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना डोके वर काढण्यापूर्वी डोंबिवलीत प्रवासी रिक्षात बसल्यावर त्याने शेअर रिक्षाचा पर्याय स्वीकारल्यावर जर रिक्षावाल्यास स्टेशनवर येईपर्यंत दुसरी सीट मिळाली नाही तरी तो १० रुपये भाडे स्वीकारत होता. कोरोनाचा उद्रेक झाल्यावर रिक्षात प्रवासी बसविण्यावर मर्यादा आल्याने गेले काही दिवस रिक्षाचालक दोन प्रवासी बसवत होते व दोघांकडून २० रुपये भाडे वसूल करत होते. मात्र आता १ मार्चपासून रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. त्यामुळे किमान भाडे डोंबिवलीत २१ रुपये झाले आहे. त्यामुळे आता रिक्षात दोन प्रवासी बसवल्यावर प्रत्येक प्रवाशाकडून संपूर्ण भाडे वसूल करण्याचा अट्टाहास रिक्षाचालकांनी करू नये. त्याचबरोबर प्रवाशांनीही दुसरा प्रवासी रिक्षात बसला असल्यास १२ रुपये प्रत्येकी भाडे द्यावे, असे पाम संघटनेने स्पष्ट केले आहे.
----/-//---/--------
वाचली