मीरा रोड : सरकारने सुरू केलेली दरआठवड्याची ३० तासांची पाणीकपात जुलैपर्यंत कायम राहणार असून नागरिकांना मात्र आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसत असताना महापालिकेने मात्र या कपातीला तोंड देण्यासाठी उपाययोजना तर दूरच, पण नियोजनही केलेले नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा त्रास दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे.
मीरा-भार्इंदरचा गुरुवारी मध्यरात्री १२ पासून शनिवारी सकाळी ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद केला जातो. कपातीमुळे ३८ ते ४० तासांनी होणारा पाणीपुरवठा थेट ७० तासांपर्यंत पोहोचला आहे. कपातीमुळे पाणी कमी दाबाने येत असतानाच गढूळ पाणीही आल्याने त्रासात भर पडली आहे. कपातीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन ते चार दिवस जातात. त्यातच पुढची कपात सुरू होते. जुलैपर्यंत कपात सुरू राहणार असताना महापालिकेने पाणीकपातीला सामोरे जाण्यासाठी तसेच भविष्यातील वाढती कपात पाहता अजून कोणतेच नियोजन केलेले नाही. पाणीकपातीच्या झळा कमी करण्यासाठी कोणत्याच पर्यायी उपाययोजना केलेल्या नाहीत. पालिके ची तसेच खाजगी मलनि:सारण केंद्रं सुरू आहेत का? तेथे पाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया सुरू आहे का, याचाही आढावा घेतलेला नाही.कपातीमुळे पाणीपुरवठा ४० वरून ७० तासांवर गेला असला, तरी येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी व वितरण योग्य पद्धतीने व्हावे, यावर लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी पथक नेमले आहे. ग्रामीण भागात अतिरिक्त शटडाउन घेतल्याने ग्रामीण व शहरी भागास समान पाणी देण्याचे नियोजन केले आहे. नवीन नळजोडण्या देण्याचे काम सुरूच राहणार आहे.- सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता
पाऊस कमी झाल्याने येत्या पावसाळ्यापर्यंत पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कपात केली आहे. विरोधकांनी पाण्यात राजकारण करू नये. आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई पालिकेकडून पाच दशलक्ष लीटर पाणी मिळवण्यासाठी निर्देश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागास बैठक घेऊन आढावा देण्यास सांगितले आहे.- सुरेखा सोनार, उपसभापती, पाणीपुरवठा समितीपाणी कमी येत आहे. आमच्या इमारतीत दिवसातून आधी दोन वेळा पाणी सोडले जायचे. पण, कपातीपासून एकच वेळ पाणी येते. तेही अपुरे असल्याने कपडे धुतल्यानंतरचे पाणी साठवून ते लादी इत्यादी कामासाठी वापरावे लागत आहे. - अवंतीमाने, गृहिणीशहरात महापालिका व सत्ताधारी भाजपाची केवळ टेंडर-टक्केवारी व बिल्डरधार्जिणी प्रवृत्ती असल्याने पाणीकपातीमुळे नागरिकांना होणाºया त्रासाकडे दुर्लक्ष करत आहेत. मलनि:सारण केंद्र सुरू ठेवून पाण्याची प्रक्रिया करून पुनर्वापर करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देणे, पाणीचोरी व गळती रोखणे तसेच पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी आयुक्तांना पत्र देणार आहोत.- प्रताप सरनाईक, आमदारआपण महापौर असतानाही पाणीकपात असायची. पण, आपण सरकारकडे तसेच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शहराची पाणीकपात रद्द करायला लावत होतो, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळायचा. आता तर शहरात मुख्यमंत्रीच सतत येत असताना पाणीकपात रद्द का नाही करत?- कॅटलीन परेरा, माजी महापौरकाँग्रेस आघाडीच्या काळात ७५ दशलक्ष लीटर पाणीयोजना मंजूर केली होती, म्हणून शहरात नागरिकांना नवीन नळजोडण्या मिळू लागल्या व पाणीही पुरेसे मिळत होते. पण, सत्ताधारी भाजपाला मात्र केवळ राजकीय प्रसिद्धी व दुसºयांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यातच स्वारस्य आहे. - जुबेर इनामदार, गटनेते, काँग्रेस