डोंबिवली : महात्मा फुले यांनी १५० वर्षांपूर्वी स्त्रियांच्या शिक्षणासाठी साखळदंड तोडले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हक्क बहाल करणारे हिंदू कोडबिल आणले. ते स्त्रियांसाठी असलेले साखळदंड तोडण्यासाठी फायदेशीर ठरले. परंतु, आताच्या स्त्रियांचा विचार केल्यास आजची स्त्री भयमुक्त आहे का? ती एकटी घराबाहेर पडू शकते का? नाक्यावर एकटी रात्री जाऊन येऊ शकते का? या प्रश्नांची उत्तरे होकारर्थी असतील तर महिला सबलीकरणाची गरज नाही, असे मत पुण्याच्या नेस वाडिया कॉलेजच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागप्रमुख सहयोगी प्राध्यापिका डॉ. वृषाली रणधीर यांनी व्यक्त केले.
‘आगरी युथ फोरम’ने क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवात गुरुवारी ‘महिला सक्षमीकरण व संपन्नता’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी रणधीर बोलत होत्या. या चर्चासत्रात एका पापड कंपनीचे जनरल मॅनेजर सुरेश कोते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. एसएनडीटी विद्यापीठाच्या पदव्युत्तर वाणिज्य विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रमिला पाटील यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी तर सूत्रसंचालन सुप्रिया नायकर यांनी के ले.
रणधीर म्हणाल्या, ‘महिलांना स्वत:ची मते मांडता येत नसतील, तिला स्वत:चे अस्तित्व काय आहे हे माहीत नसेल तर तिला सक्षमीकरणाची गरज आहे. ज्या महिला साखळदंडात अडकलेल्या आहेत त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. ज्या महिला मानसिक, सामाजिक दृष्टीने ग्रासलेल्या असतील त्यांना सकारत्मक वातावरण दिले पाहिजे. महिलांना आर्थिक, सामाजिक अशा सर्वच बाजूने सक्षम केले पाहिजे.’
कोते म्हणाले, ‘आमच्याकडे काम करणाऱ्या महिलांना केवळ हाताला काम मिळत नाही तर सन्मान मिळतो. महिलांमध्ये अनेक सुप्तगुण आहेत. त्यांचा वापर ते काम करताना करतात. पापड व्यवसाय मुंबईत सात महिलांनी एकत्र येऊन सुरू केला. आता त्यांची उलाढाल १६ कोटी रुपयांपर्यंत आहे. एखाद्या महिलेला घरी काही समस्या असल्यास ते सोडविण्याचे कामही आमच्याकडे केले जाते. त्या महिलेच्या पतीला सगळ्या महिला मिळून केवळ प्रश्न विचारतात. त्यामुळे तो लगेच मार्गावर येतो. महिलांच्या एकजुटीमुळे येथे काम करणाºया महिलांचे घटस्फोटांचे प्रमाणही कमी झाले आहे.’
आसाम येथील वातावरण पापड उद्योगाला योग्य नसल्याने तेथे महिलांना रोजगार देण्यास आम्ही सक्षम नाही. काश्मीरमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. काश्मीरच्या दुसºया भागात जेथे हवामान पापड उद्योगासाठी योग्य आहे, तेथे कार्यालय उघडले आहे, असेही त्यांनी सांगितले.