ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत मनसेने युती केल्यास ठाणे शहरातून किमान १५ जागा निवडून येतील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला. २०१७ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मनसेला युती सोयीची ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसे-भाजप युतीबाबत मनसैनिकांची मते जाणून घेण्याकरिता मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात बैठक घेत आहेत.
कोविड काळात आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून मनसे हा पक्ष सतत चर्चेत राहिला. ठाणे शहरात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे तसेच कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम तिघांनी कोविड काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. काही वेळा प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेकदा समस्या सोडविल्याने कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत मनसेने प्रशासनावर अंकुश ठेवला. ठाणे शहरात मनसे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असून येथे मनसेच्या मराठी भाषिकांच्या हितरक्षणाच्या भूमिकेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.
राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेला मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे याचा लाभ मनसे उठवू शकते. बृहन्मुंबईत भाजपचे आमदार विजयी झालेले असून तेथे भाजपला मानणारा मतदार मोठ्या संख्येने राहतो. त्या तुलनेत ठाण्यात भाजपकडे एकही आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्यात भाजपला मनसेच्या संघटनेची व राज ठाकरे यांच्या करिष्म्याची जास्त गरज आहे. त्यामुळे पुढील समीकरणांच्या जुळवाजुळवीकरिता उद्याची राज यांची भेट महत्त्वाची आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत २०१९ साली मनसेला काही पक्षांकडून मिळालेल्या छुप्या तर काही पक्षाच्या उघड पाठिंब्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मनसेला चांगली मजल मारता आली. परंतु गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सतत केलेल्या आंदोलनामुळे, वैयक्तिक टीकेमुळे भविष्यात पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी मनसेला प्रामुख्याने ठाणे शहर मतदारसंघात आपले स्थान टिकवायचे असेल तर भाजपशी युतीशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यास २०१७ ची पुनरावृत्ती टळेल आणि किमान १५ जागा मनसेला जिंकणे शक्य होईल.
पक्ष स्थापनेपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मधल्या काळात नेतृत्वाला कंटाळून पक्षाला राम राम केला. त्यांची नाराजी वेळीच दूर केली असती तर, या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला फायदा झाला असता असे मनसैनिकांचे मत आहे.
पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी वैयक्तिक संवाद साधल्यास त्यांना त्यांच्या भावना आणि अडीअडचणी जाणून घेता येईल. तसेच, पुढे काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.