ठाणे : फार झपाट्याने या ग्लोबल जगात कालचक्र वेगवान जात आहे. पण तरीसुद्धा आपली पायमुळे घट्ट रुजवून ठेवणारी जोडपी पाहिली की त्यांच्या कार्यकर्तुत्वाला मानाचा मुजरा करावासा वाटतो. खूप सुख वाटा, आणि स्वत:ही आनंदी रहा कारण परमेश्वराने कोणाच्या गाठीस किती मुठभर आयुष्य दिले हे आपल्याला माहित नसते. एकमेकांसाठी जगलो तर असे आनंदाचे क्षण आपणही साठवू अशा भावना सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केल्या.
'पाणिनी जागतिक मराठी साहित्य संस्था,ठाणे' आणि डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित जागतिक मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ, संपदा आणि राहुल कुलकर्णी, रमेश आणि रश्मी खानविलकर, दीप्ती व शैलेश गिराठे आणि दीपाली आणि आतिश सोसे या पाच दाम्पत्यांना डाॅ.विजया वाड जागतिक प्रयोगशील दाम्पत्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांना जीवनगैरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांच्या कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी स्वीकारला. ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या की, मी लोकसाहित्याची अभ्यासिका असली तरी मुख्य म्हणजे ग्रामीण लेखिका आहे. पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी स्त्री पुरूषांबद्दल लिहीणारी एकमेव लेखिका आहे हे मी अभिमानाने सांगतात. मला नेहमी विचारले जायचे कोकणातले लोक का आत्महत्त्या करत नाही, विदर्भातले का करतात? त्याचे स्पष्टीकरण माझ्या पुस्तकात लिहीले त्यासाठी मी सहा महिने विदर्भ फिरले हे सांगताना शेवटी त्यांनी शेतकऱ्यांबदद्लची सातबारा ही कविता सादर केली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी डॉ. विजया आणि डॉ. निशिगंधा वाड यांचे कौतुक करतानाणाले की, बऱ्याच माता या कार्याने मोठ्या असतात पण त्यांच्या कन्या नसतात इथे मात्र माता आणि कन्या दोघीही कार्याने मोठ्या आहेत. संस्थेच्या संस्थापिका, प्रकाशिका संगीता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अदिती ढवळे हिने सुत्रसंचालन केले.