ठाणे : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा काळ हा फार उमेदीचा काळ असतो. महत्त्वाचा क्षण असतो. असे क्षण पुन्हा येत नाही. या क्षणात भवितव्यासाठी आपले भविष्य उज्वल करायचे असेल तर वर्तमानात योग्य नियोजन केले पाहिजे. हा सुवर्णकाळ आहे, या सुवर्णकाळात मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न झोपेत नाही तर डोळे उघडून पहा. अर्जुनासारखे ध्येय ठेवले तर नक्कीच यशस्वी व्हाल असा सल्ला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्यावतीने प्लेसमेंट सेल अंतर्गत युवा रोजगार कार्यक्रम शनिवारी पी. सावळाराम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतीश शेठ, प्राचार्य डॉ.गणेश भगुरे, शुभकुंदा प्रतिष्ठानचे प्रवीण नागरे, टाटा कन्सल्टन्सीचे सतीश कालिदिंडी, समीर जैन आदी उपस्थित होते. शिनगारे पुढे म्हणाले की, जी मुले संस्कारक्षम आहेत ती मुले स्वत:ला, कुटुंबाला, राज्याला, राष्ट्राला आणि समाजाला मोठे करतात. हा कार्यक्रम करताना ज्ञानसाधना नाव प्रथम पुढे आले.
या महाविद्यालयाचे माझा पूर्वीचा संबंध आहे. निवडणुकीच्या काळात मतदान केंद्र पाहण्यासाठी या महाविद्यालयाला भेट दिली होती. तेव्हा येथील शिस्त आणि प्रत्येक कार्यक्रमास सहभागी होण्याची वृत्ती मला भावली. व्यावसायिक, नोकरी, शैक्षणिकदृष्ट्या विचार केला तर आता जग छोटे होत आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या आपल्याला मिळण्यासाठी सक्षम करावे असे ध्येय समोर ठेवावे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारे चित्रपट असतील तर त्या चित्रपटातून सामाजिक संदेश आत्मसात केले पाहिजे.
ही मुले भारताचे भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी जे करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करू. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये आल्यानंतर माझ्या काळातील महाविद्यालयाच्या आठवणी जागरुक झाल्या. कोणत्याही कार्यक्रमाप्रती आपल्यामध्ये समर्पित भाव असावा. कुठलेही काम कमी नाही ही वृत्ती आपल्यामध्ये बाळगावी असा कानमंत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी विद्यार्थ्यांना दिला.