ठाणे : निवडणुकीत स्वत: उभा नसलो, तरी दुसऱ्यांसाठी आम्ही कसे लढतो, हे या वेळी नाईक कुटुंब दाखवून देईल. कोणी कोणत्याही पदावर असेल, तरी मी घाबरत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही; पण माझ्या नादी लागाल तर पाठीची सालपटं सोलून काढेन, असा गंभीर इशारा राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी मंगळवारी भरसभेत दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. नाईक यांनीही शिंदे यांचे नाव न घेता त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. लोकसभेची बाजी मारण्यासाठी आजी आणि माजी पालकमंत्र्यांनी कंबर कसली असल्याने ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गणेश नाईक बोलत होते. या प्रचारसभेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार हुसेन दलवाई, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, गटनेते विक्रांत चव्हाण, कामगार नेते विश्वास उटगी आदी उपस्थित होते.
ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीला गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती; मात्र त्यांनी उमेदवारी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. या मुद्द्यावरून युतीच्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पराभवाच्या भीतीने मैदान सोडल्याची टीका गणेश नाईक यांचे नाव न घेता केली होती. शिंदे यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी आघाडीच्या प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. माझ्या नादी लागाल, तर सालपटं काढून सोडेन, असा इशाराच त्यांनी या वेळी दिला. २००९ च्या निवडणुकीत मी जेवढा गंभीर नव्हतो, तेवढा गंभीर या निवडणुकीत आहे. पालकमंत्री, खासदार आणि आमदार अशी पदे एकाच कुटुंबाला मिळवून देणे, हे केवळ शरद पवारच करू शकतात, असेही त्यांंनी या वेळी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असल्याचे सांगितले. भाजपला या देशातील गांधीवाद संपुष्टात आणून गोडसेवाद रुजवायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत, या देशाच्या नसानसांत काँग्रेस असून माझ्या रक्तातही काँग्रेस असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी मोदींचे कारनामे सांगणारी स्वरचित कविता सादर केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीदेखील कार्यकर्त्यांमध्ये आपल्या भाषणामधून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.‘सत्ताबदल झाल्यानंतर ‘ते’ही देशाबाहेर पळून जातील’या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मुंबईचे गँगस्टर सर्वाधिक घातक असतील, असे मला आधी वाटायचे; मात्र गुजरातचा इतिहास पाहिल्यावर माझा गैरसमज दूर झाला. सर्वाधिक घातक माफिया गुजरातचेच असल्याचा आरोप त्यांनी केला.च्एका न्यायाधीशाच्या खुनानंतरही न्याय मिळत नसेल, तर आपल्या देशात लोकशाही राहिली आहे का, असा सवालही त्यांनी केला. साधारणपणे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा कॉमर्स शाखेचा असावा, असा नियम आहे; पण आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कला शाखेचे आहेत. न्या. लोहिया, राफेल प्रश्नावर जनतेने प्रतिक्रिया दिली नाही, तर २०२४ मध्ये निवडणुका होणार नाहीत.
भाजप सरकारकडून सत्य दाबले जात आहे. खोट्यानाट्या गोष्टी काढून जनतेची दिशाभूल केली जात आहे. या सत्ताधाऱ्यांनी ज्या चोरांना साहाय्य केले, ते परदेशात पळून गेले आहेत. सत्ताधारी मंडळी गुन्हेगारी मानसिकतेची असून, सत्ताबदल झाल्यानंतर ते थेट नेपाळमार्गे परदेशात पळून जातील, अशी खिल्लीही नाईक यांनी उडवली.