लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्याचे वैभव असलेली गडकरी रंगायतन ही वास्तू म्हणजे नाट्य रसिकच नव्हे तर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेले वचन आणि कर्तृत्वाची आठवण आहे. शिवसेनाप्रमुखांची आठवण जागवणारी वास्तू पाडण्याचा डाव रचला आहे. ती वास्तू पाडण्याऐवजी तिचे नूतनीकरण करावे. ती पाडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगून शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात तरे यांनी म्हटले आहे की, मुंबईसारख्या मोठ्या शहरातही १९६७ च्या काळात सुसज्ज नाट्यगृह नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे एका ठाणेकराने चिठ्ठीद्वारे ठाणे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ठाणेकरांसाठी नाट्यगृहाची मागणी केली होती. त्याचवेळी शिवसेनाप्रमुखांनी पालिकेवर भगवा फडकवा, मी ठाणेकरांना नाट्यगृह देईल, असे वचन दिले. पालिकेवर शिवसेनेची सत्ताही आली आणि शिवसेनाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या सहकार्याने गडकरी रंगायतनसारखी ऐतिहासिक वास्तू ठाणेकरांना मिळाली. तिचे उद्घाटनही शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते १९७८ मध्ये झाले. रंगायतनमुळे अनेक नवोदित नाट्य कलाकार नावारूपाला आले. १९९९ मध्येही नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रंगायतनचा शुभारंभ शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाला. ठाणेकरांचा अभिमान आणि शान असलेली ही वास्तू पाडण्याचा प्रयत्न झाल्यास ज्येष्ठ, निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी आजीमाजी लोकप्रतिनिधी याचा पूर्ण विरोध करतील. या वास्तूचे जतन होणे, ही काळाची गरज आहे. ते तोडण्याऐवजी नूतनीकरण करून तिसरे नाट्यगृह बांधून देण्याचे आदेश देण्याची मागणीही त्यांनी या पत्रात उद्धव ठाकरे यांना केली आहे.चौकटशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनपूर्तीची ही वास्तू असून आतापर्यंत तिच्या दुरु स्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च पालिका प्रशासनाने केला आहे. आताही गडकरीच्या दुरु स्तीसाठी १८ कोटी खर्च केले जाणार आहे. तो अधिक असून या खर्चात नवीन नाट्यगृहाची निर्मिती केली जाऊ शकते. यामुळे हे जुने नाट्यगृह पाडून त्या जागेत नवीन निर्माण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला विचारूनच अनेक प्रस्ताव केले जातात. मात्र, प्रशासनाच्या या प्रस्तावाला शिवसेनेचे उपनेते तरे यांनी तीव्र विरोध केला आहे.