कल्याण : केडीएमसीच्या कचरावाहक गाड्यांवरील कंत्राटी कामगारांचा पगार थकल्याने त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. मनसे कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. पगार न दिल्यास दिवाळीत कचरा उचलणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १२० घंटागाडीचालक व २८० सफाई कामगार, असे ४०० कामगार केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास पुरविले आहेत. परंतु, प्रत्येक कामगाराला १७ हजार रुपये पगार असताना १० हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे सात हजार रुपये कुठे जातात. कंत्राटदाराकडून कमान वेतन दिले जात नाही, असा आरोप संघटनेचे राजेश उज्जैनकर यांनी केला आहे. आयुक्तांनी कंत्राटदाराचा ३० लाखांचा धनादेश काढला आहे. त्यातून कामगारांना पुरेसा पगार दिला जाणार नाही. आणखी ४० लाखांचा धनादेश काढावा, अशी मागणी मनसेने केली.मनसेचे शिष्टमंडळ आयुक्त गोविंद बोडके यांना भेटले. या वेळ मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, मनोज घरत, उल्हास भोईर, उर्मिला तांबे, प्राजक्त पोतदार आदी उपस्थित होते. आयुक्तांनी कंत्राटदार कंपनीला चर्चेसाठी पाचारण केले होते. मात्र, आठ दिवस झाले तरी कंत्राटदार आयुक्तांकडे चर्चेसाठी आलेला नाही. कंत्राटदार आयुक्तांचे ऐकत नसेल तर त्याचे कंत्राट रद्द करा. नवा कंत्राटदार नेमा, अशी मागणी मनसेने केली.कंत्राटदार कंपनीला आयुक्तांनी नोटीस काढली आहे. एक कोटी ६० लाखांचे बिल होते. त्यापैकी ६० लाख रुपये दिल्याचे आयुक्तांनी १९ आॅक्टोबरच्या महासभेत सांगितले होते. मनसेच्या मते कामगारांचा दोन महिन्यांचा पगार थकला आहे. तसेच चालू महिन्याचा पगार देणे बाकी आहे. हा पगार न मिळाल्यास कामगार दिवाळीत कचरा उचलणार नाहीत, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.>...तर नोटीस बजावणारमहापालिकेने कामगारांना किमान वेतन दिले पाहिजे. हे वेतन दिले नाही तर महापालिकेस नोटीस दिली जाईल, अशी तंबी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जागरूक नागरिकांसह आयुक्तांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली होती. कंत्राटदार किमान वेतन देत नसेल तर त्यालाही नोटीस बजावली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
...तर दिवाळीत कचरा उचलणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:20 AM