मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीतील बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतली आहे, तर काहींनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. या लसीकरणानंतर अनेक नागरिकांना ताप, अंगदुखी, हात दुखणे आदी लक्षणे जाणवली. मात्र, काहींना ना ताप आला, ना इतर आजार उद्भवले. त्यामुळे लस खरी की खोटी, अशा संभ्रमात हे नागरिक पडले.
कोरोना लस घेतलेल्या अनेक नागरिकांना मागील काही दिवसांत ताप आला नाही, तसेच सारखी सर्दी, खोकला होणे, अशा प्रकारचे आजार होण्याचे प्रमाणही कमी आहे; परंतु कोविशिल्ड लस घेतल्यानंतर २४ तासांत अनेक नागरिकांना ताप आला, तर कोव्हॅक्सिनमुळे दर आठवड्याला काही लोक आजारी पडत आहेत. या उलट काही जणांना लसीकरणानंतर ना ताप आला, ना इतर कोणती लक्षणे आढळली. त्यामुळे लसीत काही दोष आहे? लस खोटी आहे का? अशी शंका त्यांना आली. त्यामुळे झालेले लसीकरण किती प्रभावी आहे. कोरोनापासून बचाव होणार की नाही? पुन्हा तिसऱ्या लाटेत आपण कोरोनाने बाधित होणार का? अशा एक ना अनेक चिंता नागरिकांना सतावत आहेत.
----------------------------------------
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस - ५,९५,९२३
दुसरा डोस - २,४०,८०६
एकूण - ८,३६,७२९
-------------------
कोविशिल्ड लसीचा त्रास अधिक
अनेक जण सांगतात कोविशिल्ड घेतल्याने त्रास होतो; पण मी कोव्हॅक्सिन घेतली. ती कोविशिल्डपेक्षा अधिक परिणामकारक आहे. मात्र, जेव्हापासून मी लस घेतली आहे. तेव्हापासून दर आठवड्याला मला सर्दी खोकला आणि तापाचा त्रास जाणवत आहे. माझी तब्येत बिघडली आहे.
-किरण सोनावणे
---------------------------------------
लसीनंतर काहीच झाले नाही
१. मी कोविशिल्ड लस घेतली आहे. मला फक्त एक दिवस तापासारखे जाणवले. त्यानंतर मला काही त्रास झालेला नाही. मला सहव्याधी आहेत. त्यामुळे मला टेन्शन होते.
-संपताबाई कांबळे
२. मी कोविशिल्ड लस घेतली आहे. मला एक दिवसच ताप आला. त्यानंतर कोणताच त्रास झालेला नाही.
-जगन्नाथ म्हात्रे
---------------------------------------
त्रास झाला तरच परिणामकारक असे काही नाही
कोरोनाची कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस घेतल्यावर घेणाऱ्या व्यक्तीला पहिल्या दिवशी ताप येऊ शकतो. काही जणांना काहीच त्रास होत नाही. त्रास झाला तरच लस परिणामकारक आणि झाला नाही, तर लस फुसकी आहे, हा गैरसमज आहे. ही चुकीची धारणा लस घेणाऱ्यांनी मनातून काढून टाकावी. निर्धोकपणे लस घ्यावी.
-डॉ. संदीप निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
---------------------------------------