- सदानंद नाईक
उल्हासनगर : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला भाजपाचा पाठिंबा हवा असल्यास भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना अगोदर शिवसेनेनी सहकार्य करावे, अशी अट उल्हासनगरमधील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्या शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घालण्यात आली.
उल्हासनगरमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भिंवडी लोकसभेतील भाजपा उमेदवार पाटील यांना होणारा शिवसेनेचा विरोध सर्वप्रथम मोडून काढावा, अशी भाजपाची अपेक्षा आहे.
कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खा. शिंदे यांनी रविवारी सेलिब्रेशन हॉटेलमध्ये भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांसोबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. मात्र भाजपाच्या बहुंताश पदाधिकारी व नगरसेवकांनी घेतलेल्या पवित्र्याने शिंदे यांना धक्का बसला.
ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा जागांवर शिवसेनेने दावा केला होता. भिंवडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे कपिल पाटील निवडून आले आहेत. पाटील प्रचार सुरू केला आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केल्याची माहिती पाटील यांनी वरिष्ठांनी दिली आहे.
पाटील यांच्याशी असहकाराची भूमिका भिवंडीतील स्थनिक शिवसेना नेते मागे घेत नाही. तोपर्यंत भाजपा कल्याण मतदारसंघात शिवसेनेला कसे सहकार्य करील, असा सवाल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भिंवडीतील शिवसेनेचा विरोध मावळल्यानंतर, उल्हासनगरमधील भाजपा खा. शिंदे यांचा प्रचार करणार, असा पवित्रा भाजपाचे नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस प्रदीप रामचंदानी यांनी घेतल्याचे सांगितले.
वरिष्ठ नेत्यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट संकेत शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी बैठकीत दिले. उल्हासनगर भाजपाच्या पवित्र्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यामध्ये मध्यस्थी करावी लागणार, असे दिसत आहे.भाजपाचा विरोध हा क्षणिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपाची युती झाल्यावर खा. श्रीकांत शिंदे यांनी भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भिवंडीतील भाजपा उमेदवाराला होणाºया शिवसेना विरोधाच्या तक्रारी कथन केल्या. भिवंडीतील विरोधाचा तिढा सुटत नसेल तर असहकाराची भूमिका व्यक्त केली. भाजपाला पंतप्रधान व्हायचे आहे. त्यांना शिवसेनेची गरज असल्याने, सेना उमेदवारांचा प्रचार करावाच लागेल. आता या वादातून पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच मार्ग काढतील.- राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख, शिवसेना