ठाणे : शासनाने उत्सवांच्या बाबतीत आपली भूमिका लवकर जाहीर न केल्यास सरकारला जागे करण्यासाठी पुढील २० जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी ठाणे महापालिकेसमोर आराध्य दैवत गणपती बाप्पाची महाआरती घेण्यात येईल. यात ठाण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करतील, असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने प्रशासनाला दिला आहे.
ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीची किसननगर येथे रविवारी दुपारी बैठक पार पडली. यावेळी मंडळाने वरील भूमिका एकमताने घेतली. या बैठकीत ठाण्यातील ७२ मंडळे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपस्थित होती. यात मंडळांनी सर्वानुमते ठराव केले आहेत. आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांनी सरकारला व पालिका प्रशासनाला संयम ठेवून सहकार्य केले आहे. मात्र, आमच्या मागण्यांबाबत सरकार दाद देत नसेल तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत म्हणाले.
२०२० मध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे मंडळांनी सरकारच्या नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांची भूमिकाही लक्षात घ्यावी, असा आग्रह मंडळांचा असताना तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना विश्वासात घेतलेले नाही. तसेच आमच्या मागण्याही ऐकून घेतल्या जात नसल्याची नाराजी बैठकीत मंडळांनी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीत मंडळांच्या मागण्या मान्य न झाल्यास समितीला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
बैठकीत झालेले ठराव
- गणेशमूर्तीच्या उंचीवरील बंधने शिथिल करावीत.
- कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे.
- उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या दरवर्षीप्रमाणे देण्यात याव्यात व यासाठी एक खिडकी योजना प्राधान्याने राबवावी.
- मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांचे लसीकरण उत्सवांच्या आधी होण्यासाठी विशेष तरतूद करावी.
- मंडळांना विश्वासात घेऊनच २०२१ ची सुधारित नियमावली जाहीर करावी, तसेच मंडळांची व प्रशासनाची ही बैठक लवकरच लावावी.