ठाणे - पोलीस, राजकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासन एकत्र आल्यावर काय करु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याच्या द्यावे लागेल. त्यामुळेच एक आदर्श सरकार बघायचे असेल तर ठाण्याला यावे, असे सुतोवाच शिवसेनेचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथील कावेसर भागातील आरक्षित भुखंडावर २ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्राफिक पार्कचे लोकार्पण आदित्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे सुतोवाच केले. यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह हा प्रकल्प हवा म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला त्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात राजकीय यंत्रणा, विकासक, पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या असलेल्या समन्वयातून अनेक प्रकल्प ठाणे शहरात सुरु असल्याचेही त्यांंनी सांगितले. दरम्यान ट्रॉफिक पार्कच्या अनुषंगाने शहरात वाहतूक कोंडी का होते, याची साधी कारणे आहेत, परंतु ती सोडविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीचे नियम पाळणे सुध्दा गरजेचे असून अवजड वाहनांनी त्यांची लेन पाळल्यास अपघात आणि कोंडीही होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिक बंदीबाबतही त्यांनी हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने घेण्यात आला असून त्याचा आता त्रास होत असला तरी पावसाळ्यात होणारी हानी यामुळे टाळता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान आदित्य यांच्या हस्ते नितिन कंपनी आणि मानपाडा उड्डाणपुलाखालील गार्डनेचे हे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
शहरात खड्डे पडले आहेत हे खरे आहे. परंतु नवीन रस्त्यांना खड्डे पडलेले नसल्याचा दावा आदीत्य यांनी यावेळी केला. पीडब्ल्युडी, एमएसआरडीसी, पालिका प्रशासन आदींच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून ते युध्द पातळीवर बुजविण्याचे काम पालिका प्रशासन आणि येथील स्थानिक राजकीय यंत्रणा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पार्कची वैशिष्ट्ये - या ठिकाणी लहान मुलांसाठी वाहतुकीचे नियम, वाहतुक व्यवस्थापन या विषयीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी एक क्लासरुमसुध्दा सुरु करण्यात आली आहे. वाहन कसे चालावे याची माहितीसुध्दा दिली जाणार आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सिम्युलेशन ब्लॉक तयार करण्यात आले असून, लहान मुलांसाठी मोटार बाईक व कारसाठी ट्रॅक व सायकल ट्रॅक, दुचाकी वाहनांसाठी अॅडल्ट ट्रेनिंग ट्रॅक, अॅम्पी थिएटर, आर्कषक गेट, लहान मुलांसाठी खेळाची जागा, आर.टी.ओ. लायसन्स करीता रुम, कॅफेटेरिया, आदींसह महिलांना मोफत दुचाकीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या ठिकाणी अर्बन जंगलची निर्मितीसुध्दा याठिकाणी करण्यात आली आहे.