ठाणे - भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे; गोरगरीब शेतकरी आपले शेतकी उत्पादन विकण्यासाठी ठाण्यात येत असतील तर त्यांना हुसकावून लावण्याचे राजकारण करू नये; असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.दरम्यान, ‘ठामपाने अद्यापही फेरीवाला धोरणाची अमलबजावणी केलेली नाही. त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होत असून ठाणे पालिकेने सत्ताधार्यांच्या हातचे बाहुले होऊ नये; गोरगरीब शेतकर्यांना त्यांनी उत्पादीत केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारुन न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारात विक्रीकेंद्र सुरू करू’, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला. ठाण्यातील विष्णु नगर येथे फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता.भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी या कोकणातील शेतकर्याला विरोध केला, दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संदर्भात शुक्रवारी आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शेतकर्यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले.आनंद परांजपे म्हणाले की, सध्या ठाण्यात आंब्यावरुन वातावरण गरम झाले आहे. शहरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधार्यांना अपयश आले आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुन:र्वसनचा प्रश्न आ वासून उभा आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नालेसफाईचे काम रेंगाळत पडलेले आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष हे गोरगरीब शेतकर्यांना विरोध करुन राजकारण करीत आहेत. काल जे घडले तर ठाणे शहरात प्रथमच घडले आहे. किंबहुना ठाण्याची ती संस्कृतीही नाही. गेली 25 वर्षे ठामपात शिवसेनेच्या साथीने सत्ता उपभोगणार्या भाजपला या शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करता आलेली नाही.अशा स्थितीमध्ये जर शेतकरी आपला शेतमाल थेट विक्री करीत असेल तर सेना-भाजपच्या दावणीला बांधून घेत पालिका प्रशासनानेही या शेतकर्यांवर कारवाई करणे सर्वार्थाने चुकीचेच आहे. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारला 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत; शेतकर्यांना देशोधडीला लावलेले आहे. या अपयशी मोदी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्या ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी तरी ठाण्याच्या विकासाचे राजकारण करावे. ठाण्यात येऊन आपला शेतमाल विकणार्या शेतकर्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांची अडवणूक करु नये. ठामपानेही माणूसकीच्या नात्याने या शेतकर्यांवर कारवाई करु नये; अन्यथा, या शेतकर्यांना घेऊन आम्ही पालिकेच्या दारात आंबा विक्रीचे स्टॉल लावू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
मनसेच्या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादीमुळे बळ गुरुवारी रात्री झालेल्या प्रकाराचा निषेध म्हणून मनसैनिकांनी विष्णू नगर येथे धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आनंद परांजपे, माजी नगरसेवक अमीत सरय्या, राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, रवी पालव यांनी भेट दिली. यावेळी आनंद परांजपे यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आंबा भेट दिला. तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिल्यामुळे मनसेच्या आंदोलनालाही बळ मिळाले. त्यांनी लगेचच या ठिकाणी शेतकर्यांच्या आंबाविक्रीसाठी स्टॉल बांधण्यास सुरुवात केली,