ठाणे : बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगले मौन, अर्धवट शहाण्यांची संदर्भहीन बडबड आणि सर्वसामान्यांची उदासीनता यामुळे भारतीय ज्ञानसंपदा आणि परंपरेची आपल्या देशात वर्षानुवर्षे उपेक्षा झाली आहे; असे ठोस प्रतिपादन डॉ.प्रसाद भिडे यांनी केले. दीनदयाळ प्रेरणा केंद्रातर्फे येथील सहयोग मंदिरात भारतीय ज्ञानसंपदा आणि परंपरा या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यानात डॉ. प्रसाद भिडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, सदस्य संजीव ब्रह्मे उपस्थित होते.डॉ. प्रसाद भिडे यांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या आधारे अतिशय प्रभावीपणे भारतीय ज्ञानसंपदा आणि परंपरा या विषयावर मार्मिक भाष्य केले. विविध उदाहरणं देऊन भारतीय ज्ञानसंपदा आणि परंपरा या विषयाचे अनेक पदर उलगडून दाखवले. डॉ. प्रसाद भिडे पुढे म्हणाले, उपयुक्तता वादाच्या कसोटीवर भारतीय ज्ञानाला प्रश्न विचारले जातात. आता त्याचे संदर्भ काय असे विचारले जाते. मात्र, भारतीय ज्ञान समजून घेण्याची मानसिकता नाही. संशोधन केले जात नाही. पाश्चिमात्य विचार, ज्ञान हेच आधार मानले जाते. विदेशी विद्वान भारतीय ज्ञानसंपदा आणि त्याची परंपरा जाणून घेत आहेत. परंतु, आपल्याकडे नैराश्य आहे. आपल्याज्ञानपरंपरेत ६२ ज्ञानशाखा आहेत हे परंपरेने सिद्ध झाले आहे. मौखिक आणि लेखन परंपरेने या ज्ञानशाखांचे अध्ययन झाले आहे. काळच्या सर्व मोजपट्ट्यांवर या ज्ञानशाखा सिद्ध झाल्या आहेत. आपले ज्ञान काळानुरूप विकसित होत गेले आहे. त्याला संदर्भ जोडले गेले आहेत.त्याचे संकलन करण्यात आले आहे. भारतीय ज्ञानसंपदेची सिद्ध झालेल्या परंपरेचा प्रवाह सशक्त होत गेला आहे. दुर्दैवाने हा प्रवाह केवळ पाश्चिमात्य अनुकरणामुळे खंडित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपल्या ज्ञानशाखेतील योग, आयुर्वेद, सौंदर्यशास्त्र, भाषाशास्त्र, नाट्यशास्त्र या शाखांचा अभ्यास जगात सुरू आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र आपल्याकडचे नाट्यकर्मी अभ्यासत नाहित.मात्र, विदेशातील नाट्य अभ्यासक्रमात ते अभ्यासले जाते. असे डॉ.प्रसाद भिडे यांनी सांगितले.गायत्री मंत्र, शांती मंत्र हे केवळ म्हणायचे नसून आत्मसात करायचे असतात. ते समजून घ्यायचे असतात. मंत्र म्हणणे म्हणजे रूढीवाद हा गैरसमज आहे. तो लादलेला आहे. बुद्धिवंतांची निष्क्रियता आपल्या ज्ञानशाखांना मारक आहे अशी खंत व्यक्त करून डॉ. प्रसाद भिडे म्हणाले, भारतीय ज्ञानसंपदा आणि परंपरेचा जागर करण्याचा उपक्रमांना समाजाने प्रतिसाद देण्याची गरज आहे. दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते यांनी डॉ. प्रसाद भिडे यांचे स्वागत केले आणि त्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह मकरंद मुळे यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक केले. सदस्य संजीव ब्रह्मे यांनी समयोचित भाषण केले. व्याख्यानाला ठाण्यासह मुलुंड, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई येथून श्रोते आवर्जून आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक यांचीही उपस्थिती होती.