प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले आहे. या भाषेकडे तुच्छतेने पाहिले आहे. त्या वृत्तीचा मी निषेध करतो. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काही लोक दिल्लीकडे धाव घेतात, त्यांनी त्यांच्या पायाखाली काय जळतंय, हे पाहावे. यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गात खंत वाटत असेल की त्यांनी ग्रंथ चळवळ सुरू केली आणि आता ग्रंथालये बंद पडत आहेत. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार दिला जात नाही. एका महामार्गाचा खर्च आणि साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्च समानच असेल, अशी खंत सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. महेश केळुस्कर यांनी लिहीलेल्या बुक्के, जहरमाया, आणि ग्रंथोपजीविये, नभोनाट्य आणि रुपक या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कृष्णा प्रकाशन, शारदा प्रकाशन, सृजनसंवाद, नवचैतन्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
राजकीय पक्षांवर टीका करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पाटील म्हणाले की, अटलजींचा सेतू हा दगडाचा नव्हे तर साहित्य संस्कृतीचा होता. पुर्वीच्या नेत्यांचा साहित्याशी जवळचा संबंध होता आताचे राजकारणी ग्रंथदूर झाले आहेत आणि यावर साहित्यिक काहीच बोलत नाहीत. निवडणूकीनिमित्त लावण्यात येणारे फ्लेक्स यावर लाखो रुपयांची उधळण केली जाते आणि दुसरीकडे ग्रंथालयांकडे दुर्लक्ष केले जाते. जे ग्रंथ विसरतात त्यांच्या आयुष्यात अंधकाराशिवाय दुसरे काहीच नसते. साहित्य संमेलनाच्या मांडवात मिरवायला मिळते म्हणून हे राजकारणी कोटीच्या कोटी रुपये फेकतात पण साहित्य संस्कृतीकडे मात्र पाठ फिरवतात हे बरे नव्हे अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.
पुढे ते म्हणाले की, राजकारण असो वा साहित्य, जो मुहुर्त नेमका गाठतो तो दिवस त्याचा असतो. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान शपथ घेत आहेत तर दुसरीकडे डॉ. केळुसकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. डॉ. केळुसकर यांनी साहित्याचा न्यायाधीश हा काळ असतो. जो आमिष आणि धमक्यांना घाबरत नाही तो राजकीय लेखक टिकून राहतो.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्यासह कृष्णा प्रकाशनचे विद्याधर ठाणेकर, शारदा प्रकाशनचे संतोष राणे, सृजनसंवादचे गीतेश शिंदे तर नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश बोर्डे यांनी केले.