- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष सुरु आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भिवंडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.भिवंडीतील प्रदूषण वाढत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. प्रदूषणकारी कंपन्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. शहरात धाग्यावर व कापडावर प्रक्रिया करणारे सायझिंग व डार्इंग आहेत. त्यापैकी सायझिंगमधील बॉयलर गरम करण्याकरीता कोळशाचा वापर करणे गरजेचे असताना अनेक सायझिंगमध्ये लाकडांचा व टाकाऊ पदार्थांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. काही डार्इंगमध्ये विजेवरील बॉयलर चालू असल्याने त्याचे हवेतील प्रदूषण कमी असते. मात्र या बाबतची माहिती घेऊन कारवाई करण्यास मंडळाचे अधिकारी तयार नाहीत. प्रदूषण मंडळाच्या कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रात भिवंडी तालुक्याचा समावेश असून मंडळाचे अधिकारी भिवंडीत फिरकतही नाहीत. डाइंग व सायझिंगमधून निघणारे दूषित पाणी प्रक्रिया करून न सोडल्याने त्याचा परिणामही नागरिकांना भोगावा लागतो. अनेकवेळा हे प्रदूषित पाणी गटारात सोडले जाते. त्या गटाराच्या शेजारी राहणाऱ्यांना वेगवेगळ्या आजारांची बाधा होते. या बाबत नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही गटारात दूषित पाणी सोडण्यास मनाई केली जात नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डार्इंग व सायझिंग मालकांचे स्थानिक पुढाऱ्यांचे अर्थपूर्ण संबध असल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. हवेतील आणि पाण्यातील प्रदूषणाची पालिकेच्या प्रदूषण विभागाकडून वरचेवर चाचणी केली जात नाही.शहरात प्लास्टिक दाण्यांपासून मणी बनवणाºया कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्लास्टिक दाण्यापासून मणी बनवताना व बनवलेल्या मण्याला रंग देण्यासाठी करण्यात येणाºया प्रक्रियेदरम्यान विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने ज्वलनशील असल्याने त्यापासून आग लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. तरी देखील शहरात शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सर्रास सुरू आहेत. या मोती कारखान्यांत काम करणाºया महिला व पुरूषांना रासायनिक प्रक्रियेमुळे विविध आजार होतात. परिसरांतील नागरिकांना दमा व फुफ्फुसाचे आजार होतात. प्लास्टिक मण्यांना रंग लावून झाल्यानंतर त्याची डाय पुन्हा वापरण्यासाठी त्याच्या वरचे रासायनिक थर उघड्या मैदानात नेऊन जाळले जातात. हे काम सुट्टीच्या दिवशी अथवा रात्रीच्या वेळी केले जात असल्याने कोणीही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचत नाही. काही पोलीस ठाण्यांनी प्रदूषणकारी मोती कारखान्याच्या मालकांना शांतता व मोहल्ला कमिटीवर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. शहरात कमी रकमेत मजूर मिळत नसल्याने काही मोती कारखान्यांच्या मालकांनी ग्रामीण भागात बस्तान बसवले आहे.
भिवंडीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:01 AM