लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ जनावरेही दगावली. यासाठी तब्बल सात कोटी ५४ लाख इतकी नुकसानभरपाई अपेक्षित आहे. मात्र, यातून आतापर्यंत सहा कोटी ८० लाखांच्या नुकसानभरपाईचे वाटप झाले. परंतु, १०८ सार्वजनिक वास्तूंची ७४ लाखांची भरपाई शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात एक हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतीच्या नुकसानीसह दोन हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्की घरे पूर्णपणे बरबाद झाली. याशिवाय समुद्रातील दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळी अशा तब्बल चार हजार २५३ दुर्दैवी घटना घडल्या. याशिवाय तीन जणांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमी आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जवळजवळ सात कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यास अनुसरून सहा कोटी ८० लाखांची नुकसानभरपाई शासनाने आतापर्यंत वाटप केली आहे. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त १०८ मालमत्तांचे, वास्तूंचे, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांचे नुकसान वादळामुळे झाले आहे. त्यासाठीच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, शासनाने तब्बल ७३ लाख ९० हजारांची भरपाई गांभीर्याने घेतली नाही.
जिल्ह्यातील या वास्तू, शाळा, वसतिगृहे भरपाईच्या रकमेअभावी नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. काही शाळांवरील पत्रे, कौले उडाली आहेत. काहींची पूर्णपणे पडझड झाली असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यांच्या या नुकसान भरपाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.