डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरातील स्वच्छतेकडे झालेल्या दुर्लक्षतेच्या निषेधार्थ डोंबिवली शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर रविवारी कचरा फेको आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अचानक झालेल्या आंदोलनामुळे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर वंचितच्या कार्यकर्त्यांना स्मारकाची प्रतिदिन स्वच्छता राखण्याचे आश्वासन मनपाच्या वतीने देण्यात आले.
डोंबिवलीतील महापालिका इमारतीच्या आवारात आणि इंदिरा गांधी चौकालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. १४ एप्रिल २०१८ ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. या पुतळ्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नेमण्यात यावा, अशी मागणी वारंवार होत आहे. मनपाकडून या स्मारकाच्या ठिकाणच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले आहे. रविवारी स्वातंत्र्यदिनीही स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष पाहता वंचित बहुजन आघाडीचे पूर्व शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करून तो मनपाच्या डोंबिवली कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर फेकत प्रशासनाचा निषेध केला. सुरक्षारक्षकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या आवारात येण्यास मज्जाव केला. या आंदोलनाची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून अधिकारी अन्य ठिकाणी कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना स्मारकाची स्वच्छता दैनंदिन राखली जाईल, असे ठोस आश्वासन दिले. स्मारकाच्या समोर बेकायदा रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे ६ डिसेंबर आणि १४ एप्रिलच्या निमित्ताने आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या रिक्षांचा अडथळा होत असल्याकडेही ठोके यांनी लक्ष वेधले. याकडे वाहतूक पोलिसांनीही लक्ष द्यावे, अशीही मागणी ठोके यांनी केली आहे.
-----------------------------------------------------
फोटो आहे