- मयुरी चव्हाण काकडे
मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्यावर कल्याण लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. याबाबत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनीही तशी मागणी केली असती तर त्यांनाही पाठिंबा दिला असता. मात्र स्वतःच्या इगो मुळे उद्धव ठाकरे यांनी एकदाही राज ठाकरे यांना विचारणा केली नाही. नाहीतर आज चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आमदार राजू पाटील हे।लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी जोरदार चर्चा होती. तसे चित्र सुद्धा अनेकदा दिसून आले. मात्र त्यानंतर सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने या चर्चेला पूर्णविराम लागला. आता मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यावर कल्याण ग्रामीण मधील लाखो मतं महायुतीला मिळवून देण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापुर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी ५ वेळा पाठिंबा/मत मागितले होते, तेव्हा ते दिले होते, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे एकप्रकारे तेव्हापासूनच सेना भाजपाचे सूर जुळायला सुरवात झाली, असं म्हणणे वावगं ठरणार नाही.
याविषयी अधिक बोलताना पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या इगोचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः च्या इगोमुळे राज ठाकरे यांना कधीही विचारणा केली नाही. त्यांनीही पाठिंबा मागितला असता किंवा मागणी केली असती तर कदाचित आज चित्र वेगळे असते, अस पाटील म्हणाले. एकप्रकारे उद्धव यांचा इगो आडवा आला नाहीतर आज दोघे भाऊ एकत्र असल्याचं चित्र कदाचित दिसून आलं असतं, असंच पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे.
कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी राजू पाटील यांनाही ठाकरे गटाकडून ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील इतर आमदारांशी पाटील यांच्यासोबतची जवळीक दिसून आली होती. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर त्यांना महायुतीला मदत करावी लागणार आहे. अस असलं तरी पक्षाच्या पालिकडे जाऊन पाटील यांचे सर्वपक्षीय नेते / पदाधिकारी/ कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध आहेत. मनमोकळा स्वभाव, दिलदार व्यक्तिमत्व, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळून जाणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे पाटील यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. मात्र आता मनसेने महायुतीला केलेल्या मदतीची परतफेड विधानसभा निवडणूकीला करावी, अशा प्रकारची चर्चा मनसेच्या गोटात रंगली आहे.