अंबरनाथ : अंबरनाथच्या हुतात्मा चौकाला सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. शहरातील अनेक खासगी बसेसचे या हुतात्मा चौकात बेकायदा पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मुख्यत: उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच या बस उभ्या राहात असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. या बेकायदा बस पार्किंगविरोधात वाहतूक विभागाने ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अंबरनाथ शहरातील सर्वात व्यस्त चौकापैकी एक चौक म्हणजे हुतात्मा चौक. या चौकात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने या चौकाचे रुंदीकरण केले आहे. एवढे नव्हे, तर पादचाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक ठिकाणी फूटपाथही उभारले आहेत. अंबरनाथ शहरात सर्व ठिकाणी बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई होत असताना, हुतात्मा चौकातील बेकायदा पार्किंगकडे वाहतूक विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. केवळ दुचाकीवर कारवाई न करता वाहतूक विभागाने खऱ्याअर्थाने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अंबरनाथ शहरात कारखाने मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसव्यवस्था निर्माण केली आहे. हुतात्मा चौकात कामगारांना उतरवल्यानंतर या बस तिथेच पार्क केल्या जात आहेत. हुतात्मा चौकाचा विस्तार मोठा असला, तरी शेजारी शेजारी दोन ते तीन बस उभ्या केल्या जात असल्याने या भागात रस्ता अरुंद झाला आहे.
वाहनचालक त्रस्त
हुतात्मा चौकातून उड्डाणपुलाकडे जाणारा रस्ता हा आधीच अरुंद असल्याने त्या ठिकाणी बस उभी करणे म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रकार आहे. असे असतानाही अनेक बस याच रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. या बेकायदा बस पार्किंगमुळे इतर वाहनचालकांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
------------
फोटो