डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील ‘फ’ प्रभाग क्षेत्रामध्ये १२ ठिकाणी बेकायदा बांधकामे झाली असल्याची माहिती प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली. त्यापैकी आठ प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत.
शिंदे यांनी जाहीर केलेल्या बेकायदा बांधकामांच्या यादीत २०१३, २०१४, २०१७ आणि २०१९ मधील बांधकामे आहेत. त्यामुळे २०१८ मध्ये या प्रभागात बेकायदा बांधकाम झालेली नाहीत, असे या यादीवरून दिसून येते. त्याचबरोबर गच्चीवरील पत्र्याशी लोखंडी शेड, इमारतीच्या आवारातील कंपाउंड लगत असलेले बांधकाम, सात मजल्याची इमारत, सिमेंट, विटा व पत्र्यांचे निवासी बांधकाम, शेडचे बांधकाम, आर.सी. बांधकाम अशा बांधकामांचा तपशीलाचा उल्लेख यादीत करण्यात आला आहे.
गोग्रासवाडी, व्ही.पी.रस्ता, नेहरू मैदान, पाथर्ली रस्ता, कल्याण रस्ता आदी भागांतील ती बांधकामे आहेत. २०१९ मधील चार बांधकामे वगळता अन्य बांधकाम ही न्यायप्रविष्ट असल्याचे या यादीमुळे उघडकीस आले आहे. मे महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.