सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेने सुरू केलेली कारवाई राजकीय प्रेरित असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य नेत्यांनी केल्याने कारवाई वादात सापडली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मात्र पाडकाम कारवाई नियमित प्रमाणे असल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगरात कोरोना काळात शेकडो अवैध बांधकामे उभे राहिले असून अपवादात्मक वेळीच पाडकाम कारवाई झाली. नगरसेवक यांचे कार्यकर्ते व नातेवाईक अवैध बांधकामे करीत असल्याने, कुठेही हाक बोंब झाली नाही. सर्वसंमती व राजरोसपणे बहुमजली व आरसीसी अवैध बांधकामे उभी राहिली. दरम्यान शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यावर अवैध बांधकामाच्या तक्रारी प्रभाग समिती कार्यालयात आल्या. याच वेळी आयुक्त पदी अजीज शेख यांची बदली झाल्याने, त्यांनी तक्रारी प्रमाणे अवैध बांधकामावर पाडकाम कारवाईचे आदेश अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांना दिले. आयुक्तांनी आदेश देताच गेल्या तीन दिवसांपासून अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू झाली.
महापालिकेची पाडकाम कारवाई ठराविक ठेकेदारांच्या बांधकामावर सुरू असून इतरांना अभय दिले जात आहे. असे आरोप-प्रत्यारोप शहरात सुरू झाले. अवैध बांधकाम प्रकरणी शिवसेनेतील दोन गट आमने सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले. आयुक्त अजीज शेख व जमीर लेंगरेकर यांनी मात्र नियमानुसार व तक्रारीवरून अवैध बांधकामावर कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत आयुक्तांनी दिल्याने, भूमाफियाचे धाबे दणाणले आहे.
प्रभाग अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी
महापालिकेने ज्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केली. त्या प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी अजित गोवारी, तुषार सोनावणे व महेंद्र पंजाबी यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करून बदली करण्याची मागणी होत आहे. यांच्या मूक संमतीनेच बहुमजली अवैध बांधकाने उभी राहिल्याची टीका होत आहे.