भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क येथील नव्याने बांधलेल्या धार्मिक स्थळाजवळील कांदळवनालगतच्या सीआरझेडमध्ये भले मोठे निर्माणाधीन बांधकाम अखेर महापालिकेने सोमवारी तोडले. लगतच्या बेकायदा खोल्या अजून तोडणे बाकी आहे. या बांधकामावर कारवाई करण्यावरून माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यात पालिकेत खडाजंगी झाली. महापौर डिंपल मेहताही आयुक्त दालनात उपस्थित होत्या. या बांधकाम तुटल्याने शहरात त्याविषयीच चर्चा रंगली होती.
भाजपचे जिल्हा सचिव तथा ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले कमलाकर घरत यांनी प्रभाग समिती अधिकारी दीपाली पोवार यांना लेखी पत्र देऊन तुम्ही जर पैसे खाल्ले नसतील तर हे सर्व्हे क्र . ७८ क मधील नव्याने सुरू असलेले बांधकाम आणि काही खोल्यांचे बांधकाम तोडा, असे कळवल्याने खळबळ उडाली. घरत यांनी लिहिलेल्या पत्रात थेट मेहतांवर साधला होता. याआधी मनसेचे शहर संघटक दिनेश कनावजे यांनीही तक्रार केली होती. सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली होती. अखेर सोमवारी महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांसह कर्मचारी, पोलीस, बाउंसर आदींचा मोठा ताफा घटनास्थळी कारवाईला दाखल झाला. कारवाईबाबत मेहता सातत्याने आयुक्तांना संपर्क साधत असल्याचे आयुक्त दालनातील सुनावणी वेळी दिसून आले.
महतांच्या फोननंतर आयुक्तांनीही त्या भागातील एकाच बांधकामावर कारवाई न करता आजुबाजूच्या बांधकामांवरही कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. काही वेळातच महापौर डिंपल मेहता आयुक्त दालनात येऊन बसल्या. पाठोपाठ नरेंद्र मेहताही सुनावणी सुरू असलेल्या ठिकाणी आले. त्यांनाही आयुक्तांनी दालनात बसण्यास सांगितले. सुनावणी आटोपल्यानंतर आयुक्त दालनातून बोलाचालीचे आवाज बाहेर उपस्थितांना ऐकू येऊ लागल्याने आत मेहता व आयुक्तांमध्ये तणातणी झाल्याची चर्चा रंगली.
अर्धवट असलेले पक्के बांधकाम पोकलेनच्या सहाय्याने तोडण्यास घेतले असता मेहतांचे समर्थक असलेले नितीन पांडे बांधकामाच्या जागेत उभे होते. त्यांना अखेर बाजूला काढल्यानंतर पोकलेनने हे बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर त्याला लागूनच असलेल्या बेकायदा खोल्यांकडे पालिकेने मोर्चा वळवला; मात्र तेथे लोक राहत असल्याने काही दिवसांची मुदत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या भागातील एका तबेल्याचे छप्पर तोडण्यात आले. गोशाळा तोडल्याचा केला कांगावा मेहता आणि त्यांच्या काही भाजप समर्थकांनी गोशाळा तोडल्याचा कांगावा करून या प्रकरणाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला. पण हे बांधकाम अपूर्ण होते.
गेल्या आठवड्यातच याप्रकरणी सर्वेश्वर चॅरिटेबल ट्रस्टविरोधात पालिकेने एमआरटीपी कायद्यानुसार नवघर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तक्र ारींचा विविध मार्गाने पाठपुरावा सुरू असल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी काही गोवंश येथे आणून गोशाळा तोडल्याचा कांगावा केल्याचा आरोप पूजापाठ करणारे प्रदीप जंगम यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर घरत, डॉ. सुरेश येवले आदींनी केला आहे. दरम्यान बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी कोणी गोमातेचा वापर करत असेल तर ते निंदनीय असून गोमातेचा अपमान आहे. मुळात हे बांधकाम पूर्ण झाले नव्हते, मग तेथे गोवंश कसे आणून ठेवू शकतो, असा सवाल आमदार गीता जैन यांनी केला.