सदानंद नाईक
उल्हासनगर : वालधुनी किनाऱ्यावरील खुले भूखंड भूमाफियांच्या टार्गेटवर आले असून महापालिका सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भूखंडावर आरसीसीचे अवैध बांधकाम केल्या प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत अज्ञान व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. गेल्याच महिन्यात एका अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केली आहे.
उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी किनाऱ्यावर असंख्य खुले भूखंड असून हे खुले भूखंड भूमाफियांच्या टार्गेटवर आले आहे. गेल्या महिन्यात नदी किनाऱ्यावरील भूखंडावर बांधलेले अवैध बांधकाम महापालिका अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त करून, संबंधित दोघांवर एमआरटीपी अंतर्गत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई ताजी असतांना नदी किनाऱ्यावरील संतोष तबल्याच्या मागे खेती एरिया परिसरातील भूखंडावर आरसीसीचे अवैध बांधकाम होत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांना मिळाल्यावर, त्यांनी संबंधित सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांना दिली. जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन भूखंडावर अवैध बांधकाम करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली.
मध्यवर्ती पोलीसांनी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महापालिका शाळा मैदान, उद्याने, शासकीय जागा, खुल्या जागा, आरक्षित भूखंड यांना भूमाफियांचनी टार्गेट केले असून यामध्ये ते यशस्वी होत असल्याची टीका होत आहेत. वालधुनी नदी किनाऱ्यावर अवैध बांधकामे झाल्याने, नदीचे पात्र अरुंद होऊन, पुराचे पाणी सखल भागात दरवर्षी घुसत आहे. आतातर राहिलेल्या नदी किनाऱ्यावरील भूखंडावर विना परवाना आरसीसीचे बांधकाम होत असल्याने, पुराच्या पाण्याचा धोका वाढणार आहे. भूमाफियां, राजकीय नेते, महापालिका अधिकारी आदींच्या संगनमतानुसारच अवैध बांधकामे होत असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे.