उल्हासनगर : निवडणुकीच्या रणधुमाळीचा फायदा भूमाफियानी उठवीत शहरात असंख्य ठिकाणी बहुमजली अवैध बांधकामे सुरू केली. तर दुसरीकडे महापालिकेची पाडकाम कारवाई कर्मचाऱ्या अभावी ठप्प पडली आहे.
उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया एकीकडे ठप्प पडली असतांना दुसरीकडे भूमाफियांनी महापालिकेच्या नाकावर टिच्चून बहुमजली बांधकामे बांधत आहेत. शहरात शेकडो अवैध बहुमजली बांधकामे उभी राहूनही महापालिका बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. राणा खदान डम्पिंग ग्राऊंड परिसरात मोकळ्या जागेत व महादेव कंपाऊंड मध्ये व्यापारी गाळ्याची बांधकामे झाली. या गाळ्यावर यापूर्वी अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली होती. कॅम्प नं-२ झुलेलाल मंदिर, कॅम्प नं-३ महापालिका मुख्यालयकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, सी ब्लॉक शहाड स्टेशन रस्ता, अनिल-अशोक चित्रपटगृह शाळे शेजारील जुन्या इमारतीवर अवैध बांधकामे, प्रांत कार्यालय शेजारी बहुमजली बांधकामे अशी शहरभर अवैध बांधकामे होत आहे. या बांधकामाच्या तक्रारी महापालिकेकडे स्थानिक नागरिकांनी करूनही त्या तक्रारीला महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या सोबत संपर्क साधला असता, अवैध बांधकामावर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.