सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील कैलास कॉलनीसह इतर विभागातील बहुमजली अवैध बांधकामावर उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी पाडकाम कारवाई केली. या पाडकाम कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले असून बहुमजली आरसीसी अवैध बांधकामावर कारवाई कधी? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. उल्हासनगर कॅम्प नं-५ कैलास कॉलनी, पटेलनगर अश्या एकून पाच बहुमजली अवैध बांधकामासह महापालिका अतिक्रमण पथकाने मंगळवारी दुपारी पाडकाम कारवाई केली.
डॉ राजा दयानिधी यांच्या एका वर्षाच्या आयुक्त पदाच्या कालावधीत उभ्या राहिलेल्या शेकडो अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई झाली नसल्याने, आयुक्तवर सर्वस्तरारून टीका झाली. अखेर मंगळवारी उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. सहा महिन्यापूर्वी अवैध बांधकाम प्रकरणी आयुक्तवर अशीच टीका झाल्यावर आयुक्तांनी प्रभाग अधिकारी यांची बदली करून प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. तसेच तत्कालीन उपायुक्त मदन सोंडे यांनी प्रभाग अधिकारी यांच्याकडून अवैध बांधकामाची यादी मागविली होती. मात्र त्यानंतर काहीएक कारवाई झाली नाही. मात्र बदली केलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्त केल्याने, महापालिका प्रशासनावर टीका झाली.
शहरात गेल्या एका वर्षात शेकडो आरसीसीची अवैध बांधकामे उभी राहिली असून सर्वस्तरातून कारवाई करण्याची मागणी होऊन तक्रारीचा पाऊस महापालिकेकडे पडला. अखेर मंगळवारी उपायुक्त प्रियंका रजपूत यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने कॅम्प नं-५ कैलास कॉलनीसह एकून चार ठिकाणच्या अवैध बांधकामावर पोलीस सरंक्षणात पाडकाम कारवाई केली. शहरातील इतर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने होत असून कॅम्प नं-३ येथील संत कंवाराम चौकात जुन्या इमारतीवर दुमजली अवैध बांधकाम झाले. येथे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी पाडकाम कारवाईची मागणी होत आहे. तसेच कॅम्प नं-५ येथील महापालिका शाळा प्रांगणात उभ्या राहिलेल्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेविकेने महापालिकेकडे केल्याने, सरकारी जागा सुरक्षित नसल्याचे उघड झाले.
आरसीसीच्या बहुमजली बांधकामावर कारवाई कधी?
महापालिका अतिक्रमण विभागाने अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केल्याने, शहरातून त्यांचे स्वागत होत आहे. मात्र गोरगरीब व गरजू नागरिकांचे लहान बांधकामावर कारवाई करण्या ऐवजी धनदांडगे, भूमाफिया यांच्या आरसीसीच्या अवैध बांधकामाकडे महापालिकेचा मोर्चा वळून, त्यावर पाडकाम कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे.