लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : दिव्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिला गेला आहे. दिव्यावर बसलेला बेकायदा बांधकामांचा शिक्का लवकरच पुसणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथे झालेल्या सभेत दिले. तसेच ठाण्याप्रमाणेच दिव्यातही क्लस्टर राबवण्यात येईल, असा शब्द यावेळी त्यांनी दिवेवासीयांना दिला.
दिव्यात मंजूर केलेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. शिंदे म्हणाले की, बुलेट ट्रेन या भागातून जाणार आहे. बीकेसीनंतर दिवा येथील म्हातार्डे येथे दुसरे स्थानक आहे. या गावानजीक असलेल्या बेतवडे गावात पंतप्रधान आवास योजनेतून दाेन हजार ८०० घरे बांधली जाणार आहेत. राज्यभरात १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. दिव्यातील डम्पिंग हटविण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे इतर आश्वासनेही पूर्ण केली जातील, असे ते म्हणाले. दिव्यातील सभेच्या आधी खिडकाळेश्वर येथील प्राचीन शिव मंदिराच्या परिसरसुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले. दरम्यान, दिवा येथील सभेवेळी शाॅर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
वारकरी भवनासाठी आणखी १५ कोटी
- आगरी कोळी वारकरी भवनाच्या उभारणीसाठी मंजूर केलेला १५ कोटींचा निधी कमी पडणार असल्याचा उल्लेख कल्याणचे खासदार शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. त्यानंतर या भवनासाठी आणखी १५ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. डाेंबिवली आणि दिव्याच्या वेशीवर मायसिटी प्रकल्पानजीक दाेन एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन शिंदे यांनी केले.
- मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाला. या घटनेत एक ४५ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.