मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने भाईंदरच्या उत्तर भागात एका हॉटेलचे शेड, चार बंगले व एका घराचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
मीरा-भाईंदरमधील विशेषतः प्रभाग समिती १ व ६ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू आहे. याबाबत सातत्याने तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा नेहमीचा अनुभव आहे. उत्तन भागातील बेकायदा बांधकामांबाबत आलेल्या तक्रारीनंतर उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे, तसेच कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक माणिक पाटील, पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ठेका मजूर यांनी चार ट्रॅक्टर, एक जेसीबी व एक पोकलॅनच्या साहाय्याने शुक्रवारी तोडक कारवाई केली. उत्तन शिरे रोड येथील चार बेकायदा बंगले व एका घराचे बांधकाम जमीनदोस्त केले. तसेच डोंगरी येथील मिडटाऊन हॉटेलच्या बेकायदा शेडवर कारवाई करण्यात आली.