कल्याण : भूसंपादनासाठी खरेदी-विक्रीच्या थेट प्रक्रियेस प्रतिसाद मिळत नसल्याने सक्तीने भूसंपादन करण्यास सुरुवात केली जाईल, असे कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी ऑगस्टमध्ये स्पष्ट केले होते. मात्र, मुंबई-वडोदरा महामार्गाच्या प्रकल्पाच्या जागा मोजणीच्या वेळी जागेवर बांधकामे नव्हती. मात्र, मोजणी झाल्यावर तेथे बांधकामे झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
एखादा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सगळ्यात प्रथम प्रकल्पात बाधित होत असलेली जागा संपादित करणे महत्त्वाचे असते. महसूल खात्याकडून संपादनाची प्रक्रिया राबविली जाते. मुंबई-वडोदरा महामार्ग हा कल्याण तालुक्यातून जात असून, त्यात काही गावांतील जागा बाधित होत आहेत. बल्याणी भागातील जागा बाधित होत असल्याने जागेची मोजणी करण्यात आली. ती झाल्यावर त्यावर पुन्हा बांधकामे झाल्याचे दिसून येत आहे. कल्याण तहसील कार्यालयाने बांधकामे करणाऱ्यांना ऑगस्टमध्ये नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने या नोटिसा केवळ फार्स ठरल्या आहेत.
कल्याणचे तहसीलदार व लिपिक लाच प्रकरणात अडकल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी तहसील कार्यालय हे तहसीलदाराविना आहे. नव्या तहसीलदारांना कल्याण तहसीलचा चार्ज दिलेला नाही.
कारवाईकडे दुर्लक्ष
टिटवाळा, आंबिवली, बल्याणी परिसरातील गावांत बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. तेथे चाळी उभारल्या जात असताना, त्याकडे कारवाई करण्यास महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा फटका मुंबई-वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला बसत आहे.
--------------------------