उल्हासनगर : ओव्हरफ्लो झाल्याने बंद केलेल्या राणा डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी चक्क बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू झाले आहे. पावसाळ्यात कचऱ्याचा ढिगारा कोसळून जीवितहानी होण्याची भीती भाजपचे नगरसेवक महेश सुखरामनी यांनी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपायुक्त आदींना सुखरामनी यांनी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे म्हारळगावजवळील दुर्गानगर राणा खदान येथील डम्पिंग ग्राउंड कचऱ्याने ओव्हरफ्लो झाल्यावर तत्कालीन आयुक्तांनी खबरदारी म्हणून डम्पिंग ग्राउंड कॅम्प नं. ५ परिसरातील खडी खदान येथे स्थलांतरीत केले. तेव्हापासून शहरातील कचरा खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. तर राणा खदान ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत बनविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी १० कोटींचा निधी सरकारकडून मिळाला आहे. तर दुसरीकडे भूमाफिया राणा खदान डम्पिंग ग्राउंड शेजारील खुल्या जागेवर बेकायदा बांधकामे करीत आहेत. गेल्या आठवड्यात सहायक आयुक्त अनिल खातुरानी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केलेले बेकायदा बांधकाम पुन्हा उभे राहिले आहे.
ओव्हरफ्लो झालेल्या व बंद ठेवलेल्या राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम १० कोटींच्या निधीतून सुरू असताना दुसरीकडे ग्राउंडच्या पायथ्याशी असलेल्या कचऱ्याचे सपाटीकरण जेसीबीद्वारे करून चाळींचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप सुखरामनी, मनसेचे प्रवीण माळवे आदींनी केला आहे. उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीवर कोसळून जीवितहानी होण्याची भीती या दोघांनी व्यक्त केली आहे.