ठाणे : मागील महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात लावलेल्या एलईडी स्क्रीनच्या मुद्यावरून शिवसेनेने चांगलेच टार्गेट केले होते. परंतु, बुधवारी झालेल्या महासभेत मात्र याच अनधिकृत एलईडी स्क्रीनला सत्ताधारी शिवसेनेने पाठबळ देऊन सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा करण्यास नांगी टाकून बिनशर्त मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागील महासभेत एलईडी स्क्रीनचा वीजपुरवठा खंडित केल्याने भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर आगपाखड केली होती. शिवसेनेनेच पालिकेच्या वीजपुरवठा विभागाला सांगून तो बंद केल्याचा आरोपदेखील केला होता. परंतु, बुधवारी झालेल्या महासभेत शिवसेनेने घुमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेला मिळत असतानादेखील अशा प्रकारे पाठबळ दिल्याने त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वीजपुरवठा खंडित करण्यामागचे कारण स्पष्ट करण्याची तसेच स्क्रीनचा वीजपुरवठा पूवर्वत करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी गेल्या महासभेत केली होती. त्यास आक्षेप घेऊन हे एलईडी स्क्रीन बेकायदा असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला होता. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी झाली होती. एलईडी स्क्रीनबरोबरच शहरातील पदपथांवर उभारण्यात आलेली वाचनालये आणि बेंचवर कारवाईचा आग्रह धरून भाजपने सर्वपक्षीय नगरसेवकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
तलवार म्यान का केली?
भाजपच्या याच भूमिकेमुळे शिवसेनेने तलवार म्यान केली का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. एलईडी स्क्रीनबाबत आयुक्तांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. बुधवारी झालेल्या महासभेत बेकायदा एलईडी स्क्रीनला सायंकाळी ७ ते रात्नी ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला.
-----------