लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गुंगीच्या औषधांची नशेसाठी बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या फमीदा शेख (४०) या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. तिच्याकडून अल्फ्राझोलम, कफ सिरप आणि कोरेक्स असा नऊ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.फमीदा ही मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील जामा मशिदीच्या मागील बाजूला गेल्या काही दिवसांपासून कोडीन फॉस्फेट सिरप, बटण (झोपेच्या टॅबलेट्स), खोकल्यावरील औषधे आणि अल्फ्राझोलम ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बिनधास्तपणे विक्री करीत होती. तिच्याकडे या औषधविक्रीचा कोणताही परवाना नसताना काही स्थानिक गुंडांच्या मदतीने ती नशेच्या औषधांची अमली पदार्थांच्या नावाखाली विक्री करीत होती. परिसरातील नागरिकांनी तिची थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ठाण्याचे अमली पदार्थविरोधी पथक, अमली पदार्थ नियंत्रण कक्ष आणि अन्न व औषध प्रसाधन या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाईत तिला ९ मे २०१७ रोजी अटक केली. तिच्याकडून मॅक्सकॉफ क्लोरोफिनायरेमीन मेलीट आणि कोडीन फॉस्फेटच्या ९४ बॉटल्स, कोरेक्स कफ सिरपची एक बॉटल, एल रेक्सस, एक्सीडील कफ लीन्कटस, अल्फ्राझोलम टॅबलेट असा सुमारे १० हजारांचा औषधांचा साठा हस्तगत केला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर घाडगे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. फमीदाच्या साथीदारांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुंगीच्या औषधांची बेकायदेशीरपणे विक्री
By admin | Published: May 11, 2017 2:00 AM