भार्इंदर : झंकार कंपनीसमोर सेव्हन इलेव्हन कंपनीने थाटलेल्या बेकायदा दुकानांवर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवारी कारवाई केली. तत्कालीन आयुक्तांसह प्रभाग अधिकारी या बेकायदा दुकानांना पाठीशी घालत आले होते.
प्लेझंट पार्कनाक्यापासून पटेल बंगल्यासमोरील रस्त्याजवळील भूखंड १० मार्च २०१९ रोजी कंपनीने महापालिका आणि पोलिसांना कारवाई करायला लावून ताब्यात घेतला होता. हा भूखंड विकासक नरेश शाह यांच्या ताब्यात होता. मूळ मालक जयराज देविदास यांच्या सोबतच्या समझोत्यानुसार शाह यांनी सर्व जमीन मोकळी करण्यापासून विविध शुल्क आदींचा भरणा स्वत: केला होता. पण, नरेंद्र मेहता हे आमदार असताना त्यांच्या कंपनीने देविदास यांच्याशी करार करून हा भूखंड घेतला. पण, या भूखंडावर शाह यांच्यासह काही झोपड्या व आदिवासींचा ताबा असल्याने पालिकेने झोपड्या, फलक तोडण्याची कारवाई केली होती. या भूखंडावर काही महिन्यांपूर्वी पत्रा, ताडपत्री व बांबूचे शेड टाकून बेकायदा दुकाने बांधली. यात फर्निचर, गाड्या यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू होता. वीजपुरवठाही दिला होता. अशा बेकायदा पत्राशेडना आगी लागूनही पालिका प्रशासन या बेकायदा बांधकामांना संरक्षण देत होते. रहिवाशांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती.
डांगे आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर आमदार गीता जैन यांनी या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी याची माहिती घेतली असता अधिकाऱ्याने ही बांधकामे जुनी असल्याचा कांगावा करत नोटीस द्यावी लागेल, अशी चुकीची माहिती देऊन आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला होता. अधिकारी खोटे बोलत असल्याचे कळताच बांधकामे तोडण्याचे आदेश दिले.