लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना आपत्तीचे निर्बंध धुडकावत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या ठाण्यातील बारमधील बेकायदा बांधकामांना महापालिकेचे संरक्षण मिळत आहे. या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे मंगळवारी केली. महापालिका हद्दीतील बहुसंख्य बारमध्ये बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. अग्निशमन विभागाचा ना हरकत परवाना नसतानाही बिनदिक्कतपणे बार सुरू आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना निर्बंधांमुळे ठाण्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांना दुपारी चारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची सक्ती केली जाते. मात्र, डान्स बार पहाटेपर्यंत सुरू ठेवले जातात. व्यापाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारणाऱ्या महापालिका व पोलिसांना बार सुरू असल्याचे कसे दिसले नाही. बारवाल्यांना एक न्याय, तर सामान्यांना दुसरा न्याय लावला जात आहे, अशी टीका डावखरे यांनी केली. संबंधित बारवर सुरक्षेचे छत्र ठेवणारा बडा सूत्रधार अजूनही मोकळाच आहे. या सूत्रधारावर सर्वप्रथम कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.