- नितिन पंडीत
भिवंडी: गर्भलिंगनिदाना बरोबरच असुरक्षित गर्भपात करण्यास कायद्याने बंदी घातली असली तरी मेडिकल स्टोर बरोबरच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींनी सध्या गर्भपाताच्या गोळ्या विकण्याचा गोरखधंदा सुरु केल्याची खळबळजनक बाब भिवंडीत समोर आली आहे. विशेष म्हणजे या गोरखधंद्यावर वैद्यकीय विभागासह पोलीस यंत्रणा व प्रशासनाचे कोणतेही धाक नसल्याने सऱ्हास पणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री भिवंडीत होत आहे .
३०० रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत या गर्भपाताच्या गोळ्या माणूस बघून विकल्या जात आहेत. एका दक्ष नागरिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये हि खळबळजनक बाब समोर आली आहे . विशेष म्हणजे कायद्याची बंदी असतांनाही मेडिकल मध्ये डॉक्तरांच्या कोणत्याही लेखी प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या मिळत असल्याने गर्भपाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र यावर शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने अवैध गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय जाधव असे दक्ष नागरिकाचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून भिवंडीत काम करीत आहेत. भिवंडीत गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात अशी माहिती मिळाल्या नंतर जाधव यांनी भिवंडीतील शास्त्री नगर परिसरातील एका मेडिकल दुकानात या गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करतांना स्टिंग ऑपरेशन केले त्यात हि खळबळजनक माहिती समोर आली . भिवंडीतील अनेक मेडिकल मध्ये अशा प्रकारे अवैध रित्या गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत असल्याने यामुळे गर्भपात कायद्याचा सऱ्हासपणे उल्लंघन होत असून समाजात भ्रूण हत्या वाढण्याची शक्यता देखील जाधव यांनी वर्तविली असून या अवैध गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकांसह खासगी इसमांवर कारवाई करावी अशी मागणी देखील जाधव यांनी केली आहे.
या गोळ्या स्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे . मात्र भिवंडीत चणे फुटाणे विकतात तशा पद्धतीने सऱ्हासपणे या गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात आहेत . डॉक्टरनचा सल्ला न घेता या गोळ्या खाल्ल्याने स्त्री ला भविष्यात गर्भपिशवीसंदर्भतील त्रास होऊ शकतो तर कधी कधी गोळ्यांमध्ये पूर्ण गर्भ पडत नसल्याने गर्भ पिशवी साफ करण्याची वेळ अथवा काढून टाकण्याची वेळ महिलेवर येते यामुळे महिलांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते अशी माहिती स्री रोग तज्ञ् डॉ सुप्रिया अरवारी यांनी दिली आहे.भिवंडीत अनेक अवैध धंदे सुरु असतांना आता महिलांच्या जीवाशी खेळून अवैध गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटवर अन्न व औषध प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .