- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी ठाणे तसेच भिवंडी अंजूरफाटा माणकोली या दोन्ही महामार्गांवर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे बंदी असलेल्या अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. विशेष म्हणजे, दंडाच्या रूपाने वाहतूक पोलीस या अवजड वाहनांकडून पावत्या फाडून या अवजड वाहनांना प्रवेश देत असल्यानेच या दोन्ही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील वंचितच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून वाहतूक पोलिसांनी या अवजड वाहनांवर या मार्गावरून प्रवासास दिवसाची बंदी घातली नाही तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील वंचितच ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिला आहे. भिवंडी काल्हेर ठाणे मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे त्यामुळे हा रास्ता आधीच अरुंद झाला आहे. त्याचबरोबर चिंचोटी अंजूरफाटा माणकोली हा रस्ता अहमदाबाद महामार्गाला जोडला जात असल्याने तसेच दोन्ही मार्गांवर गोदाम पट्टा असल्याने या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये जा असते त्यामुळे या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ज्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे . मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अवजड वाहने या मार्गावरून दिवसभर ये जा करत असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्यां आजही जैसे थे अशीच आहे . या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वंचितने लक्ष वेधले असून या दोन्ही महामार्गावरून अवजड वाहनांची अवैध वाहतूक बंद करण्याचे कठोर निर्देश वाहतूक पोलिस प्रशासनास द्यावे अशी मागणी भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वाहतूक पोलीस अवजड वाहनांकडून पैसे घेतात व बंदी असतानाही ही अवजड वाहने या दोन्ही रस्त्यावर ये जा करतात, वाहतूक पोलिसांनी ही अवैध अवजड वाहतूक बंद केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिली आहे .