लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयाच्या सीमेवरुन परराज्यात विनापरवाना तसेच सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन न करता परस्पर प्रवाशांची वाहतूक करणा-या ८२ बसेसवर ठाणे प्रादेशिक परिहवन विभागाच्या १२ पथकांनी कारवाई केली आहे. यामध्ये बसेसच्या जप्तीसह त्यांचा परवानाही एक महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे प्रादेशिक परिहवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या आदेशाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शनिल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पथकांमधील २४ निरीक्षकांनी पडघा टोल नाका, गुजरात सीमेवरील दापचरी, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल आणि नवी मुंबईतील वाशी आदी ठिकाणी २० ते २३ जून दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात २० जून रोजी ३५ बसेस, २१ जून रोजी १८, २२ जून- १८ आणि २३ जून रोजी ११ बसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात पडघा येथे १६, दापचेरी येथे १२, फाऊंटन हॉटेल येथे १८ तर वाशी येथे ३६ बसेस ई पास न घेताच विनापरवाना जात प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळले. यामध्ये सामाजिक अंतराचे नियम न पाळणे, अधिकृत कागदपत्रे न बाळगणे असे अनेक नियम धाब्यावर बसविल्याचे आढळले. त्यांच्याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.