डोंबिवली: शहरातील अवैध रिक्षा स्टँडवर तातडीने कारवाई करावी, त्यातून वाहतूक कोंडी सोडवावी. तसेच रेल्वे स्थानक परिसरात येणा-या दुचाक्या शहरात पहाटे ६ पासून रात्री उशिरापर्यंत पार्क केल्या जातात. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये त्या पार्क करण्याची रचना लावावी असे आदेश वाहतूक विभागाचे डीसीपी अमित काळे यांनी दिले.
ठाणे येथून सरप्राईज व्हिजिट देण्यासाठी ते मंगळवारी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी एसीपी सतीश बांदेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांच्यासमवेत शहरांतर्गत वाहतूक कोंडी, नियोजन करण्याचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शहरातील इंदिरा गांधी चौक असो की शिवमंदिर चौक, पश्चिमेलाही दिनदयाळ रोड असो की फुले रोड आदी सर्व ठिकाणी जर अवैध रिक्षा स्टँड असतील, तसेच ज्या स्टँडमुळे कोंडी होत आहे अशा सर्व स्टँडवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात तातडीने सूचना काढाव्यात संबंधितांना सूचित करावे आणि कार्यवाही करावी असे त्यांनी आदेशात केले.
काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शहरात येणा-या विविध कंपनीच्या बसेस या देखिल फडके रोड परिसरात येतात त्यामुळेही कोंडीत भर पडत आहे. तसेच टिळक पुतळयानजीक टूर्सच्या बस येतात. त्या बसचालकांना तंबी द्यावी, शहरात न येण्याच्या सूचना द्याव्यात. जेणेकरून मंजुनाथ, टिळक पथ, फडके रोड, बाजीप्रभू चौक आदी परिसरात होणारी वाहतूक कोंडी थांबवणे सहज शक्य होईल. जे बसचालक ऐकणार नाहीत अशांना तसेच बिनधास्त शहरात घुसणा-या वाहनचालकांवर ईचलनद्वारे कारवाई करावी. तसेच खासगी बसचालकांनाही कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
पी१ पी २ मध्ये दुचाकी गाड्या लागतात. दिवसरात्र त्या तेथे असतात त्यामुळे शहरातील वाहतूकीचे नियोजन कोलमडते. त्यामुळे अशा वाहनांसाठी ठाण्याच्या राममारूति रोडच्या धर्तीवर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रस्त्याच्या एका दिशेला तर दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत रस्त्याच्या दुस-या दिशेला गाड्या पार्क कराव्यात. सूचना देवूनही ज्या दुचाकी गाड्या तेथून हटणार नाहीत अशा गाड्यांवर टोर्इंगची कारवाई करावी असेही त्यांनी आदेशीत केले.