डोंबिवली: महानगरपालिकेचा भोंगळ कारभार नेहमी चव्हाट्यावर येत असतो. त्याचाच एक प्रकार पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत घडला आहे. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील सुमारे ४००-४५० दिव्यांग व्यक्तींना दरमहा पेन्शन दिले जाते. दिव्यांग व्यक्तींना नोव्हेंबर २०१९ पर्यंतचे पेन्शन मिळाले असून त्यांना त्यानंतर पाच महिने झाले तरी पेन्शन मिळालेली नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांना दिव्यांग व्यक्तीनी साकडे घालून यात तात्काळ लक्ष देण्याची मागणी केल्याने हे प्रकरण उजेडात आले.
या संदर्भात आमदार चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना सोमवारी पत्र लिहून तात्काळ पेन्शन अदा करण्याची मागणी केली . महापालिका क्षेत्रात जवळपास ४००-४५० दिव्यांग पेन्शनधारक असून मध्यंतरी त्या संबधित फाईलवर पालिका प्रशासनाने अकार्यक्षमतेचा शेरा मारला होता पण महासभेच्या ठरवानंतर सदर अकार्यक्षमतेची अट रद्द करण्यात आलेली होती.
चव्हाण यांनी सांगितले की लॉक डाऊनच्या सद्य परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींची उपासमार होत असल्याच्या लेखी तक्रारी काही दिव्यांग व्यक्तींनी माझ्या नजरेस आणून दिल्या. याबाबत महापालिकेने स्पष्ट निर्णय घेतला असताना हेतुपुरस्सर दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येत नसल्याचे दिसून आले त्यामुळे यादीतील दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यावर तात्काळ पेन्शनची रक्कम अदा करण्याची मागणी केली.