लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आयरे गावात यंदाही खाडीचे पाणी शिरल्याने सुमारे ५०० नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. २०१९ मध्येही पुराचा तडाखा बसला होता. मात्र त्यावेळी तातडीने नागरिकांना तहसीलदार व अधिकाऱ्यांनी अन्नधान्य तसेच आर्थिक मदत केली होती. आताही तशीच मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी तहसीलदार दीपक काकडे यांच्याकडे सोमवारी केली आहे.
आयरे गावातील समता नगर, सहकार नगर, श्रीराम नगर, गणेश प्रसाद चाळ, कोपर पूर्व परिसर, बेडसिंग मैदान आदी परिसरातील सुमारे ५०० घरे पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांचे खूप हाल झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे त्यांना सरकारकडून तत्काळ मदत मिळणे अपेक्षित आहे. मदतीपासून नागरिक उपेक्षित राहू नये, अशी मागणी टावरे यांनी केली.
२०१९ मध्ये तत्कालीन युती सरकारने सुमारे दोन महिने पुरेल एवढा शिधा पूरग्रस्तांना दिला होता, तेवढाच किंबहुना लॉकडाऊन परिस्थिती बघता त्याहून जास्त सहकार्य केले जावे, अशी अपेक्षा टावरे यांनी व्यक्त केली. त्यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नुकसान झालेल्यांना सरकारी निकषानुसार निश्चित सहकार्य केले जाईल, असे सांगितले आहे.
------