ठाणे: शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्याना पाणीपुरवठा करण्यासाठी २७६ कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी येत्या १५ दिवसात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना गती देऊन प्राधान्याने त्या योजना मार्गी लावण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागा मार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांचा आढावा श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, आमदार दौलत दरोडा, आमदार गणपत गायकवाड, आमदार शांताराम मोरे, आमदार गीता जैन, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, आमदार बालाजी किणीकर , उपाध्यक्ष सुभाष पवार, जल जीवन मिशन संचालक आर.विमला, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत येणारी ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा दरमहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. जलजीवन मिशनव्दारे प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे तसेच अपूर्ण असलेल्या योजनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. २१ मार्च पर्यंत सर्व योजना पुर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे.सर्व तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजनांना सहकार्य करण्याचे तसेच त्या वेळेत पुर्ण करण्याचे आश्वासन श्री पाटील यांनी यावेळी दिले.
योजनां अपूर्ण राहिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्यास त्यासाठी सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही श्री पाटील यांनी दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
जलजिवन मिशन अंतर्गत अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर तालुक्यातील प्रगतीपथावरील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. संबंधित तालुक्यातील आमदारांनी पाणी पुरवठा योजनांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले. त्याचबरोबर जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांच्या कार्य अहवालाचे सादरीकरण कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे यांनी केले.बैठकीचे आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले.