कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात अॅड. संजय मिश्रा यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना एक पत्र पाठविले आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्यास खड्डे बुजविण्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल, असे मिश्रा यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात मिश्रा राहतात. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. असे असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका दरवर्षी नागरिकांकडून मालमत्ता करापोटी कोट्यवधींची वसुली करते. गेल्याच वर्षी मालमत्ता करापोटी ३५० कोटींची वसुली केली होती. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपये आहे. नागरिकांनी मालमत्ता कर न भरल्यास महापालिका प्रशासनाकडून जप्ती आणि लिलावाची कारवाई केली जाते. तसेच मालमत्ता कराच्या थकबाकीचा धनादेश वेळेवर न वटल्यास महापालिका संबंधित मालमत्ताधारकावर गुन्हा दाखल करते. ही कारवाई करताना महापालिका जशी तत्परता दाखविते तशी खड्डे बुजवण्यासाठी दाखवली जात नाही. या दिरंगाई व बेपर्वा केल्याप्रकरणी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई का करू नये. महापालिकाही कारवाईस पात्र आहे. आयुक्तांना केवळ पत्राद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली असली तरी खड्डे न बुजविल्यास महापालिकेच्या विरोधात कायदेशीर नोटीस काढली जाईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिश्रा यांनी सूचित केले आहे.